मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारकोप आणि मालवणी परिसरातील शासकीय भूखंडावरील अंदाजे ३०० ते ३५० अनधिकृत झोपड्यांचे निष्कासन करून एकूण पाच एकर शासकीय भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला. अतिक्रमणमुक्त करण्यात आलेल्या जमिनीचे रेडी रेकनरनुसार अंदाजित मूल्य ११३.२५ कोटी रुपये आहे. चारकोप येथील नऊ एकर शासकीय भूखंडापैकी चार एकर क्षेत्रावरील अतिक्रमण निष्कासित करण्यात आले.

मालवणीतील १३ एकर शासकीय भूखंडापैकी एक एकर क्षेत्रावरील अतिक्रमण निष्कासित करण्यात आले. चारकोप आणि मालवणी येथील संबंधित शासकीय भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ २२ एकर आहे. त्यापैकी अतिक्रमणमुक्त करण्यात आलेल्या पाच एकर क्षेत्राचे रेडी रेकनरनुसार अंदाजित मूल्य ११३.२५ कोटी रुपये आहे.

निष्कासित क्षेत्राच्या सरासरी प्रति एकर मूल्याच्या आधारे उर्वरित १७ एकर जमिनीसह संपूर्ण २२ एकर क्षेत्राचे अंदाजित एकूण मूल्य ४९८.३० कोटी रुपये, म्हणजेच सुमारे ५०० कोटी रुपये, इतके आहे, असे उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले.

मालवणी व चारकोप परिसरात मोठ्या प्रमाणात शासकीय भूखंडावर अतिक्रमण झाले आहे. यापैकी २२ एकर भूखंडावरील अतिक्रमण हटविण्याचा मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानंतर उर्वरित भूखंड मोकळा केला जाणार आहे. उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने आतापर्यंत गेल्या सात ते सात महिन्यांत तब्बल ५३ एकर शासकीय भूखंड अतिक्रमणांपासून मुक्त करण्यात आला आहे. मानखूर्द येथील २० एकर भूखंडांसह कुर्ला भंगार परिसरातील ११ एकर, टाटा पॉवर लाईन व मुख्य महामार्गालगत सहा एकर, देवनार येथील शकीला अन्सारी कंपाऊंड तसेच चेंबूर येथील शंकरा वसाहतीतील दोन एकर, बोरिवली व अंधेरी तालुक्यातील १४ एकर अशी एकूण ५३ एकर शासकीय भूखंडावरील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. महेंद्र कल्याणकर, उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन), पश्चिम उपनगरे गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत महसूल विभाग, मुंबई पोलीस, बृहन्मुंबई महानगरपालिका, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, नगर भूमापन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच अदानी इलेक्ट्रिसिटी यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने सहभाग घेतला. कारवाईचे नियोजन, संबंधित विभागांशी समन्वय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन), बोरीवली-१, श्रीमती उज्वला भगत यांनी विशेष पाठपुरावा केला.

शासकीय भूखंडावरील अतिक्रमणे निष्कासित करून शासकीय मालमत्तेचे संरक्षण करणे तसेच सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शासकीय जमिनीचे प्रभावी व्यवस्थापन सुनिश्चित करणे, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली, असेही कटियार यांनी सांगितले.