मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिला व हवामान बदल या विषयांवर काम करणाऱ्या संस्थांनी राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी ‘महिला आणि हवामान बदलावरील जनतेच्या मागण्यांची सनद’ तयार केली आहे.‘रिसोर्स ॲण्ड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट’ आणि ‘बाईमाणूस मीडीया रिसर्च फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ही सनद तयार केली आहे. महिलांना स्थानिक आणि राज्यस्तरीय हवामान मंडळे आणि निर्णय घेणाऱ्या समित्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी या सनदीमध्ये करण्यात आली आहे. याचबरोबर अन्न, पाणी आणि स्वच्छतेच्या संदर्भातील महिलांच्या समस्या समजून घेऊन हवामान संकटाचा सामना करण्यासाठी उपाययोजना कराव्या, तसेच असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी हवामान आपत्ती प्रतिरोधक असणारी घरकुल रचना आणि आर्थिक संरक्षणाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. तसेच उर्जा संक्रमणामुळे प्रभावित होणाऱ्या महिला समुदायांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण व उपक्रमांची आखणी करणे गरजेचे असल्याचे या सनदेत नमूद केले आहे.
तापमानवाढ, अनियमित पाऊस याचा सर्वात जास्त परिणाम महिलांवर होतो. झोपडपट्टीतील महिलांना पुरामुळे आरोग्य आणि स्वच्छेतेच्या सुविधांची कमतरता भासते. यासाठी हवामान बदलाच्या संकटांचा सामना करण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागासाठी नियोजन करणे आवश्यक असल्याचेही सनदेमध्ये म्हटले आहे.महिलांवर होणाऱ्या परिणामांचा कोणत्याच धोरणात विचार होताना दिसत नाही. म्हणून आम्ही या सनदीद्वारे व स्थानिक पंचायत स्तरातील कामांतून हे बदल घडवण्याचे उद्दिष्ट असल्याचे मत सनद मसुदा समिती सदस्या डॉ. कविता वरे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून ‘बाईमाणूस’ आणि ‘रिसोर्स ॲण्ड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट’ संस्था महाराष्ट्रातील विविध भागातील महिलांना हवामान बदलाबाबत नेतृत्व करण्यासाठी प्रशिक्षण देत आहेत. ‘बाईमाणूस’ या संस्थेने अनेक महिलांसोबत हवामान बदलाच्या विविध पैलूंवर स्थानिक स्तरावरील समस्यांबाबत संवाद साधला. तसेच ‘रिसोर्स ॲण्ड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट’ संस्थेने राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये सुमारे २५० ‘हवामान गाव संवाद’ कार्यक्रमांचे आयोजित केले आहे. या अनुभवांच्या आधारे या दोन संस्थांनी महिलांच्या हवामान बदलाच्या समस्या सोडवण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण मागण्यांची सनद तयार केली आहे.