मुंबई: महाराष्ट्रातील सनदी अधिकारी राजेश अगरवाल यांची केंद्र सरकारमध्ये कौशल्य विकास विभागाच्या सचिवपदी बुधवारी नियुक्ती करण्यात आली. केंद्रात सचिवपदी नियुक्त होणारे अगरवाल हे राज्यातील तिसरे अधिकारी आहेत. केंद्र सरकारने १३ अधिकाऱ्यांना सचिवपदी बढती दिली. त्यात राज्यातील अगरवाल यांचा समावेश आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील १९८९च्या तुकडीतील अगरवाल हे सध्या केंद्रात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागात अतिरिक्त सचिवपदी कार्यरत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी अशा कौशल्य विकास विभागाची जबाबदारी अगरवाल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.  राज्याच्या सेवेतील अपूर्वचंद्र हे माहिती व नभोवाणी तर अरविंद  सिंह हे पर्यटन विभागाच्या सचिवपदी कार्यरत आहेत.