टाटा स्टील कंपनीच्या ‘कॉर्पोरेट कम्युनिकेशन’ विभागाचे प्रमुख व ज्येष्ठ पत्रकार चारुदत्त देशपांडे यांना आत्महत्येस प्रवृत्त केले गेल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांच्या हस्ताक्षरातील डायऱ्यांमधील तपशील महत्त्वाचा दुवा ठरला आहे. या माहितीवरून वसई पोलिसांनी कंपनीच्या जमशेदपूर येथील कॉर्पोरेट अफेअर विभागाचे प्रमुख प्रभात शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
‘फोर्ब्स इंडिया’चे संपादक इंद्रजित गुप्ता यांच्या तक्रारीवरून वसई पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या तपासातही देशपांडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळूनच आत्महत्या केली असावी, असा निष्कर्ष काढला होता. देशपांडे यांच्या गूढ आत्महत्येप्रकरणी गुन्हे विभागाने तपास सुरू केल्यानंतर वसई पोलीसही सक्रिय झाले. गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्यात आली. मे २०१२ ते मे २०१३ या काळात टाटा स्टीलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देशपांडे यांचा आत्यंतिक मानसिक छळ केल्यामुळे त्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागले, असे गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून तपास अधिकारी उपअधीक्षक प्रशांत देशपांडे यांनी गुन्हा दाखल केला.
गेल्या जून महिन्यात देशपांडे यांनी आत्महत्या केली. त्याआधी काही दिवस कंपनीच्या विरोधात एका प्रसिद्ध मासिकात वृत्तमालिका छापून आली होती. त्यामुळेच त्यांचा मानसिक छळ सुरू करण्यात आला. ही वृत्तमालिका संपूर्णपणे टाटा स्टील कंपनीच्या विरोधात नव्हती. मात्र, कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी देशपांडे यांच्यावर ठपका ठेवण्यास सुरुवात केली. त्याच काळात फोर्ब्स या मासिकातही आलेल्या वृत्तमालिकेनंतर देशपांडे यांच्या मानसिक छळात आणखी भर पडली, असा निष्कर्ष मुंबई पोलिसांनी काढला होता. जमशेदपूर येथील देशपांडे यांच्या कार्यालयातील संगणक जप्त करून पोलिसांनी तब्बल हजारहून अधिक मेलची तपासणी केली होती. त्या अनुषंगाने अनेक अधिकाऱ्यांची चौकशीही केली होती.

डायरीत काय होते?
देशपांडे यांच्या बोरिवली येथील घरात पोलिसांना २०१२ आणि २०१३ च्या दोन डायऱ्या सापडल्या. या डायऱ्यांमध्ये चारुदत्त यांनी कार्यालयात घडलेल्या प्रत्येक तपशिलाची नोंद करून ठेवली होती. एका पानावर त्यांनी काही टिपणे लिहून टाटा स्टील कंपनीतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावेही लिहून ठेवली होती. या तपशिलावरून देशपांडे यांच्या मन:स्थितीची कल्पना येत होती. त्यातून आलेल्या नैराश्यातूनच त्यांनी आत्मह्त्या केली असावी, असा अंदाज तपासाशी संबंधित एका अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. या कंपनीत येण्याची आपली सर्वात मोठी चूक होती, असेही देशपांडे यांनी एका पानावर लिहून ठेवले होते.