राज्य सरकारकडून सोमवारी राज्य पर्यटन विभागाच्या सदिच्छादूतपदी (ब्रँड अम्बेसेडर) खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संभाजीराजे हे पर्यटन विभागाच्या पुरातत्त्व विभागाचे ब्रँड अॅम्बेसेडर असतील. सध्या राज्यभरात विविध मागण्यांसाठी निघत असलेल्या मराठा समाजाच्या लाखोंच्या मोर्च्यांच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंची पर्यटन विभागाच्या सदिच्छादूतपदावरील नियुक्ती सूचक मानली जात आहे. मराठा समाजाचा असंतोष कमी करण्याच्यादृष्टीने सरकारकडून ही नियुक्ती करण्यात आल्याची शक्यता आहे. मात्र, गड आणि किल्ल्यांच्या संवर्धनासाठीच आपण हे पद स्विकारल्याचे छत्रपती संभाजी राजे यांनी स्पष्ट केले.
कोपर्डी घटनेनंतर गेल्या काही दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात मराठा समाजाकडून मूक क्रांती मोर्चे काढण्यात येत आहेत. या माध्यमातून सत्तेबाहेर असलेल्या मराठा नेतृत्त्वाकडून सरकारला शह देण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चाही सुरू आहे. गेल्या काही काळात भाजपमधील मराठा चेहरा म्हणून संभाजीराजेंची प्रतिमानिर्मिती करण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे काही दिवसांपूर्वी नांदेड येथील मराठा मोर्चात सहभागी झाले होते. पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा पाया वाढविण्याच्या उद्देशानेच कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणनू राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, संभाजीराजांनी आपण कोणत्याही पक्षाशी बांधील नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

[jwplayer EztVJWax]

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chatrapati sambhaji maharaj appointed as brand ambassador of maharashtra tourism
First published on: 19-09-2016 at 17:25 IST