चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कोकणातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वहाळ (चिपळूण) येथे आयोजित केल्या जाणाऱ्या निवासी आणि निर्धार वर्गातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. हुशार विद्यार्थ्यांसाठी निवासी वर्ग तर नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी निर्धार वर्गाचे आयोजन करण्यात येते. निवासी आणि निर्धार वर्गाचा निकाल अनुक्रमे १०० व ९७ टक्के इतका लागला आहे.

निर्धार वर्गात फक्त अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. या निर्धार वर्गातील नऊ विद्यार्थ्यांनी साठ टक्क्यांहून अधिक गुण मिळवून प्रथम श्रेणी पटकाविली आहे.

यातील एकाने ८२ व अन्य एकाने ७५ टक्के गुण मिळविले आहेत. हुशार विद्यार्थ्यांच्या निवासी वर्गात प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांला ९७ टक्के गुण मिळाले आहेत.  ५६ पैकी ४१ विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. १३ विद्यार्थ्यांना ८५ ते ९० टक्के गुण मिळाले आहेत.

या दोन्ही वर्गातील मुलांना शिकविण्यासाठी मुंबई, पुणे, रत्नागिरी येथून तज्ज्ञ शिक्षक वहाळ येथे खास उपस्थित असतात.

मुंबईच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा लवकरच सत्कार करण्यात येणार आहे.