मुंबई : पूर्व मुक्त मार्गाचा घाटकोपरमधील छेडा नगर ते ठाण्यातील आनंद नगर दरम्यान विस्तार केला जात आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या मार्गाच्या कामास वेग दिला असून या कामातील एक महत्त्वाचा टप्पा नुकताच पार पडला. या प्रकल्पात एकूण २८८ स्पॅन उभारण्यात येणार असून यापैकी पहिल्या स्पॅनची सोमवारी यशस्वी उभारणी करण्यात आली. पूर्व द्रुतगती महामार्गावरील भांडुप पंपिंग स्टेशनजवळील खांब क्रमांक पी७८ या खांबावर ९० टनाहून अधिक वजनाचा पहिला सेगमेंट ११५ मीटर लांबीच्या यांत्रिक लाँचिंग गॅन्ट्रीच्या सहाय्याने उभारण्यात आला. या कामामुळे आता उन्नत मार्गिकेच्या मुख्य संरचनेच्या उभारणीच्या कामास सुरुवात झाली असून आता कामास वेग मिळणार आहे.
पूर्व उपनगरातून दक्षिण मुंबईत अतिजलद जाण्यासाठी एमएमआरडीएने १६.८ किमीचा पूर्व मुक्त मार्ग बांधून २०१३ मध्ये हा मार्ग वाहतूक सेवेत दाखल केला. या मार्गामुळे चेंबूर – पी. डीमेलो मार्गादरम्यानचा प्रवास सुकर झाला. मात्र मरीन ड्राईव्हला जाणाऱ्या वाहनांना ऑरेंज गेटला, तर ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांना घाटकोपरमध्ये वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे एमएमआरडीएने दोन्ही दिशेला या मार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार छेडा नगर – आनंद नगर उन्नत मार्गिकेच्या माध्यमातून विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. ही उन्नत मार्गिका १३.९ किमीची असून ही सहा पदरी मार्गिका मुलुंड, ऐरोली जंक्शन, जेव्हीएलआर, विक्रोळी, कांजुरमार्ग, मानखुर्द आणि घाटकोपर अशी जाणार आहे. या मार्गामुळे घाटकोपर – ठाणे अंतर काही मिनिटात पार करता येणार असून हा प्रवास वाहतूक कोंडीमुक्त असणार आहे. या प्रकल्पाचे काम सध्या वेगात सुरू असून एमएमआरडीएने प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा सोमवारी पूर्ण केला. पूर्व द्रुतगती महामार्गावरील भांडुप पंपिंग स्टेशनजवळील खांब क्रमांक पी ७८ वर ९० टनाहून अधिक वजनाचा पहिला सेगमेंट ११५ मीटर लांबीच्या यांत्रिक लाँचिंग गॅन्ट्रीच्या सहाय्याने उभारण्यात आला. या कामासाठी कुठेही वाहतूक थांबविण्यात आली नव्हती.
छेडा नगर – आनंद नगर उन्नत मार्गिकेसाठी एकूण २८८ स्पॅनची उभारणी केली जाणार आहे. आता पहिला स्पॅन उभारण्यात आल्याने मुख्य संरचनेच्या कामास सुरुवात होणार आहे. पुढील स्पॅनच्या उभारणीसही वेग येणार आहे. उभारण्यात आलेल्या पहिल्या स्पॅनचे वजन १४५० टन असून या स्पॅनची लांबी ४० मीटर आहे. या स्पॅनमध्ये १६ सेगमेंट आहेत. दरम्यान, प्रकल्पातील मोनोपाइले ८१ टक्के, ग्रुप पाइलचे १९ टक्के, पिअरचे ५१ टक्के आणि पिअर कॅपचे ३३ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील एकूण ३,७३२ प्रीकास्ट सेगमेंटपैकी आतापर्यंत १३५ सेगमेंटचे कास्टिंग पूर्ण झाले आहे. आता कामाला अधिक वेग देऊन ही मार्गिका डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यास प्रवासाचा कालावधी २० ते २५ मिनिटांनी कमी होऊन वाहनचालक-प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
