मुंबई : बेस्टच्या ताफ्यातील देवनार आगाराच्या कंत्राटी बसच्या बॅटरी बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना रविवारी सकाळी चेंबूर येथे घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.मात्र वारंवार कंत्राटी बसमध्ये बिघाड होत असल्याने या बसच्या देखभाल-दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच प्रवासी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

उपक्रमाच्या देवनार आगारातील कंत्राटी बस (एसएमटीएटीपीएल) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ए-३६४ या मार्गावर धावत होती. बस माहूल गाव ते ट्रॉम्बे या मार्गावर धावत असताना, चेंबूर कॉलनी, राम मंदिर येथे पोहोचल्यावर चालकाच्या केबिनखालून धूर येत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. चालकाने तात्काळ बस थांबवली आणि वाहनाची तपासणी केली. तपासात,बॅटरी बॉक्समध्ये ठिणगी पडल्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती. चालकाने तात्काळ बसमधील तिन्ही अग्निशामकांचा वापर करून सकाळी ८.१५ वाजता आग विझवली. या घटनेदरम्यान प्रवाशांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र, तोपर्यंत चालकाने बसमधील अग्निशामकांचा वापर करून आग विझवली होती. खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बॅटरीचे कनेक्शन तोडले आणि बसमधून बॅटरी काढून टाकली. या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही. बेस्टचे मेकॅनिक आणि संबंधित कंत्राटदाराचे मेकॅनिक घटनास्थळी आले. त्यानंतर पुढील तपासणी व आवश्यक कारवाईसाठी बस देवनार डेपोमध्ये नेण्यात आली.

दरम्यान कंत्राटी बसचे अपघात वाढत आहेत. त्यातच कंत्राटी बसमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने देखभाल-दुरुस्ती वेळेवर केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कंत्राटी बसची देखभाल-दुरुस्ती बेस्ट उपक्रमाने स्वता करावी अशी मागणी जोर धरत आहे.