मुंबई: चेंबूरमधील सुभाष नगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून सहा कामगार जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या सर्व जखमींना तात्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून चेंबूरमधील सुभाष नगर परिसरातील अनेक जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे. येथील इमारत क्रमांक ३६ च्या पुनर्विकासाचेही काम सुरू आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी कामगार आठव्या मजल्यावर काम करत होते. त्याच वेळी अचानक सहा कामगार आठव्या मजल्यावरून खाली पडले. घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलिसांना तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी कामगारांना तत्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, यापैकी एका कामगाराचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला, इतर पाच जणांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या दुर्घटनेत रामल्लू याचा मृत्यू झाला, तर गुणधर राय (२२) याची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच उसराई (३०), रमेश राय (२५), विजय (३५), संदीप (२७) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कामगारांना सुरक्षेसाठी लागणारे कुठल्याही प्रकारचे साहित्य पुरवण्यात आले नसल्याने ही दुर्घटना घडली असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. या प्रकरणी चेंबूर पोलिस अधिक तपास करत आहेत.
