मुंबई: चेंबूरमधील कलेक्टर कॉलनी परिसरातील डीबीसी शाळेच्या प्रवेशद्वारावर गुरूवारी दुपारी अचानक एक नारळाचे झाड कोसळले. विद्यार्थी शाळेमध्ये असताना ही घटना घडली असून सुदैवाने या दुर्घटनेत जीविता हानी वा कोणीही जखमी झाले नाही.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. पावसासोबत सोसाट्याचा वारा वाहत असल्याने अनेक ठिकाणी झाडे पडत आहेत. दोन दिवसांपूर्वी चेंबूरच्या ११ वा रस्ता येथे शाळेच्या बसवर पिंपळाचे एक जुने झाड कोसळून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास चेंबूरमधील कलेक्टर कॉलनी परिसरातील स्वामी विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या डीबीसी शाळेच्या प्रवेशद्वारावर नारळाचे झाड कोसळले. या झाडासोबत सोसायटीला लागून असलेली संरक्षक भिंतही कोसळली.
या शाळेच्या परिसरात सकाळी, दुपारी आणि सायंकाळी विद्यार्थी आणि पालकांची मोठी गर्दी असते. सुदैवाने दुपारी ३ च्या सुमारास विद्यार्थी शाळेत असतांना ही घटना घडली. त्यामुळे कोणालाही इजा झाली नाही. मात्र या परिसरातील खासगी सोसायट्यांमधील अनेक झाडांची कित्येक वर्षे छाटणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे पालिकेने तत्काळ या झाडांची छाटणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
