मुंबई: भर उन्हात रांगेत उभे राहिल्यानंतरही गॅस सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी शनिवारी सकाळी चेंबूरमधील शीव – पनवेल मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. परिणामी, या मार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

इराण – अमेरिका, इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. पूर्वी दोन दिवसात मिळणारा गॅस सिलिंडर सध्या १५ ते २० दिवसानंतर उपलब्ध होत आहे. परिणामी, नागरिकांना गॅस सिलिंडर घेण्यासाठी गॅस वितरकांच्या कार्यालयाबाहेर लांबच लांब रांगेत ताटकळत राहावे लागत आहे. चेंबूरमधील भक्ती भवन परिसरातील गॅस सिलिंडर वितरकाच्या कार्यालयाबाहेर शनिवारी सकाळी गॅस सिलिंडरसाठी मोठी

रांग लागली होती. भर उन्हात रांगेत उभे राहिल्यानंतरही गॅस सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी थेट शीव – पनवेल मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. या संदर्भात माहिती मिळताच चेंबूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.