मुंबई : सप्टेंबर २०२५ पासून बंद असलेली चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेल सेवा पावसाळ्याआधी सुरू करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन होते. त्यानुसार मोनोरेलचे अत्याधुनिकीकरण करून या मार्गिकेला सुरक्षा प्रमाणपत्रही प्राप्त झाले. मात्र तरीही मोनोरेल सेवेत दाखल करण्यासाठी एमएमआरडीएला मुहूर्त मिळू शकलेला नाही. त्यामुळे प्रवाशांची मोनोरेल प्रवासाची प्रतीक्षा वाढत आहे.
चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेल मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासूनच तोट्यात आहे. तर दुसरीकडे मोनोरेलमध्ये अपघातांची, दुर्घटनांची मालिका सुरूच आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये एकाच दिवशी दोन गाड्या अतिवजनामुळे कलंडल्या. एका गाडीचे दरवाजे तोडून प्रवाशांना बाहेर काढावे लागले. ही घटना ताजी असतानाच मोनोरेल मार्गिकेवर पुन्हा दुर्घटना घडली. त्यानंतर मोनोरेल प्रकल्पावर टीकेची झोड उठली आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला. या पार्श्वभूमीवर सप्टेंबर २०२५ मध्ये एमएमआरडीएने मोनोरेल सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली.
मोनोरेल गाड्यांचे, यंत्रणेचे अत्याधुनिकीकरण करण्याच्या कामाला सुरुवात केली. नव्या गाड्या मोनोरेलच्या ताफ्यात दाखल करून त्यांच्या चाचण्या सुरू केल्या. अत्याधुनिकीकरण आणि चाचण्या यशस्वी झाल्यानंतर मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्या चाचण्याही सुरू केल्या. चाचण्या सुरू असताना एमएमआरडीएने पावसाळ्याआधी मे अखेरीस वा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मोनोरेल पुन्हा सेवेत दाखल करू, असे जाहीर केले. मात्र आता जुलै उजाडला तरी मोनोरेल सेवेत दाखल होण्याची प्रतीक्षाच आहे.
मोनोरेलसाठी ४ जूनला सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले. सुरक्षा प्रमाणपत्र ही मोनोरेल वा मेट्रोचे संचालन करण्यासाठीची अंतिम प्रक्रिया आहे. त्यानुसार सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर मोनोरेल सेवेत दाखल करणे अपेक्षित होते. मात्र सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त होऊन एक महिना पूर्ण झाला तरी मोनोरेल सेवेत दाखल झालेली नाही. मोनोरेल सेवेत दाखल करण्यासाठी एमएमआरडीएला मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे. याविषयी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
चेंबूर मेट्रो स्थानकाच्या लोकार्पणाचीही प्रतीक्षा
अंधेरी पश्चिम – मंडाले मेट्रो २ ब मार्गिकेतील चेंबूर मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. तर या स्थानकाच्या संचालनासाठीही सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. हे स्थानकही मे, जूनमध्ये सेवेत दाखल केले जाणार होते. मात्र या स्थानकाच्या लोकार्पणासाठीही एमएमआरडीएला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे मंडाले – चेंबूर मेट्रो प्रवासाचीही प्रतीक्षा कायम आहे.
