मुंबई : चेंबूर – संत गाडगे महाराज मोनोरेल मार्गिकेवरील प्रवासी संख्या वाढविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) चेंबूर येथे मोनोरेल आणि मेट्रोला जोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार व्हिएनपी-आरसी मार्ग मोनोरेल स्थानक ते अंधेरी पश्चिम-मंडाले मेट्रो २ ब मार्गिकेतील चेंबूर मेट्रो स्थानक असा १२५ मीटरचा पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. या पादचारी पुलाच्या कामास आतापर्यंत सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र हा प्रकल्प अद्यापही कागदावरच आहे. या पादचारी पुलाच्या कामासाठी खासगी जागा संपादित करावी लागणार असून हाच भूसंपादनाचा अडथळा या पुलाच्या कामात निर्माण झाला आहे. हा अडथळा दूर करण्यासाठी एमएमआरडीए आणि मुंबई महानगरपालिका यांच्यात चर्चा सुरू आहे. त्यामुळे हा अडथळा दूर झाल्यानंतरच पादचारी पुलाचा मार्ग मोकळा होणार आहे.

जगातील एकमेव मोनोरेल मार्गिका अशी ओळख असलेली चेंबूर ते संत गाडगे महाराज मोनोरेल मार्गिका तोट्यात आहे. तर अपघातांमुळे ही मार्गिका वादग्रस्त ठरली आहे. दरम्यान, मागील दहा महिन्यांपासून ही मार्गिका बंद आहे. मार्गिकेचे अत्याधुनिकीकरण करून नव्या रूपात मोनोरेल सेवेत दाखल करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार अत्याधुनिकीकरण पूर्ण झाले असून या मोनोरेलच्या संचालनासाठी सुरक्षा प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे. मात्र तरीही मोनोरेल सेवा सुरू करण्यात आलेली नाही.

जून-जुलैमध्ये मोनोरेल पुन्हा सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन होते. मात्र हा मुहूर्त चुकला. काही मोनोरेल स्थानकांच्या दुरुस्तीची किरकोळ कामे शिल्लक असल्याने संचालनास विलंब होत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. एकीकडे मोनोरेल पुन्हा सेवेत दाखल होण्याची प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडे मोनोरेल-मेट्रो जोडणीही कागदावरच आहे. मोनोरेलवरील प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो २ ब मार्गिकेतील चेंबूर मेट्रो स्थानक आणि व्हिएनपी-आरसी मार्ग मोनोरेल स्थानक पादचारी पुलाने जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाचे म्हणजे मोनोरेल मेट्रोशी जोडून प्रवासी संख्या वाढविण्यासाठी २०२७ मध्ये पूर्ण होणाऱ्या मेट्रो २ ब मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील एकमेव चेंबूर मेट्रो स्थानक सेवेत दाखल करण्याचा निर्णयही एमएमआरडीएने घेतला आहे. तर या मेट्रो स्थानकाशी मोनोरेल स्थानक जोडण्यासाठी १२५ मीटर लांबीचा आणि २.५ मीटर रुंदीचा पादचारी पूल बांधण्याचाही निर्णय घेतला आहे. या पुलासाठी १२ ते १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या पुलाचे काम जून-जुलैपर्यंत पूर्ण करून मोनोरेल मार्गिका आणि चेंबूर मेट्रो स्थानक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन होते. मात्र अद्यापही पुलाच्या कामास सुरुवात झालेली नाही.

याविषयी एमएमआरडीएच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी या पादचारी पुलाच्या कामासाठी पालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याचे सांगितले. मात्र हा पादचारी पूल ज्या खासगी जागेतून जात आहे, त्या खासगी जागेचे भूसंपादन अद्याप झालेले नाही. भूसंपादनाचा प्रश्न निर्माण झाला असून तो सोडविण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. लवकरच भूसंपादनाचा प्रश्न निकाली काढून पुलाच्या कामास सुरुवात करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मेट्रो स्थानकावरून थेट मोनोरेल स्थानकावर आणि मोनोरेल स्थानकावरून थेट मेट्रो स्थानकावर जाण्यासाठी प्रवाशांना बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.