मुंबई: भर उन्हाळ्यात भर उन्हाळ्यात मुंबई महापालिकेचा चेंबूर येथील जलतरण तलाव बंदच आहे. गळतीच्या कारणास्तव जलतरण तलाव बंद असून महिन्याभरात याबाबत पालिकेला कोणतीही उपाययोजना करण्यात अपयश आले आहे. वार्षिक १२ हजार रुपये भरून सदस्यत्व घेणाऱ्या जलतरणपटूंची गैरसोय होते आहे.

चेंबूर पूर्व येथे मुंबई महापालिकेचा जनरल अरुणकुमार वैद्य ऑलिम्पिक जलतरण तलाव आहे. हा तलाव गेल्या किमान महिन्याभरापासून बंद आहे. भर उन्हाळ्यात तलाव बंद असल्यामुळे पोहोणाऱ्यांची, व्यायामपटूंची मोठी गैरसोय होत आहे.

मुंबई महापालिकेचे एकूण तेरा जलतरण तलाव विविध ठिकाणी आहेत. या तरणतलावाचे सभासदत्व घेण्यासाठी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद असतो. उन्हाळ्याच्या दिवसात तरणतलावात पोहोण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असते. तसेच शाळांना सुट्ट्या पडल्यामुळे लहान मुलेही मोठ्या संख्येने येत असतात. त्यात चेंबूरच्या ऑलिम्पिक जलतरण तलावासाठी तब्बल ३१७१ सदस्य आहेत. मात्र हा तलाव बंद असल्यामुळे या सदस्यांची गैरसोय होते आहे. मुंबई महापालिकेने याबाबत तत्काळ कार्यवाही करून हा तलाव लवकर सुरू करावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी समाजमाध्यमांवरून केली आहे.

चेंबूरच्या तलावाला गळती ….

चेंबूरच्या जनरल अरुण कुमार वैद्य जलतरण तलावाला गळती लागली असून सतत पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. ही गळती शोधण्याचे आव्हान सध्या पालिकेच्या यंत्रणेसमोर आहे. ते काम कधी होईल याबाबत काहीच शाश्वती नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

६ हजार ते १२ हजार शुल्क … चेंबूरचा जलतरण तलाव हा ऑलिम्पिक दर्जाचा तलाव असून या तलावात पोहायला येणाऱ्यांना तब्बल ६४६० ते १२,३०० रुपये वार्षिक शुल्क भरावे लागते. महापालिका कर्मचारी, नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना वार्षिक ६४६० रुपये शुल्क आहे. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी १२,३०० रुपये वार्षिक शुल्क आहे. या ठिकाणी मासिक आणि त्रैमासिक सदस्यत्वाची सोय नाही. त्यामुळे भलेमोठे वार्षिक शुल्क भरूनही ऐन उन्हाळ्यात जलतरण पटूंना पोहता येत नाही अशी स्थिती आहे. मुलुंडचा तलावही बंद …. मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रिडा संकुलातील जलतरण तलाव हा गेल्या कित्येक दिवसांपासून बंद आहे.

हा तलाव आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून सध्या त्याची दूरवस्था झाली आहे. लाद्या तुटल्या आहेत, पंप नादुरुस्त आहे, पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा बिघडली आहे. त्यामुळे या सगळ्या दुरुस्तीची कामे हाती घेतली असून ही कामे पूर्ण होण्यास एक महिना लागणार आहे. जून महिन्यात हा तलाव सुरू होईल अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिली.

जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे काम कंत्राटदाराला देण्यात येणार नसून मुंबई महापालिकेचा संबंधित विभागच त्याची दुरुस्ती करणार आहे. त्यामुळे कामे दर्जेदार होतील असा विश्वास प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केला.