मुंबई:- चेंबूरच्या डायमंड उद्यान परिसरात मंगळवारी दुपारी एका स्कुल व्हॅनवर एक भले मोठे झाड कोसळले. या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये चार विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास ही घटना चेंबूरच्या सेंट अँथनी हायस्कुल परिसरातील ११ वा रस्ता येथे घडली. टिळक नगर परिसरात असलेल्या युनिव्हर्सल विद्यालयाचे विद्यार्थी घेऊन ही व्हॅन परिसरात मुलांना घरी सोडण्यासाठी आली होती.

याच वेळी ११ व्या रस्त्यावर असलेले एक जुने झाड अचानक या व्हॅनवर कोसळले. यावेळी या व्हॅनमध्ये १२ ते १५ विद्यार्थी होते. व्हॅनच्या मागच्या बाजूला हे झाड पडल्याने यामध्ये पाच विद्यार्थी पूर्णपणे अडकले होते. येथील स्थानिकांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर चेंबूर पोलीस, अग्निशमन दल आणि पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ चार विद्यार्थ्यांना बाहेर काढत त्यांना परिसरातील झेन रुग्णालयात दाखल केले. मात्र मागच्या बाजूला बसलेला विहान श्रीवास्तव (११) हा मुलगा यामध्ये पूर्णपणे अडकला होता. त्याच्या अंगावरच झाड कोसळले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून देखील त्याला बाहेर काढले नाही.

अखेर अर्ध्यातासानंतर क्रेनच्या साह्याने झाडाला बाजूला करत विहानला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला तत्काळ झेन रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.