मुंबई : शिधावाटप दुकानातील धान्य शिधापत्रिका धारकांना न देता त्याची काळाबाजारात विक्री करणाऱ्या एका महिलेसह तीन जणांविरोधात चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यावेळी दोन टेम्पोसह गहू आणि तांदळाचा मोठा पोलिसांनी जप्त केला आहे.
चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी परिसरात २४ जानेवारीला काहीजण दोन टेम्पोमधून मोठ्या प्रमाणात शिधावाटप दुकानातील धान्य घेऊन जात असल्याची माहिती चेंबूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन दोन्ही टेम्पो ताब्यात घेतले. त्यात शिधावाटप दुकानातील गव्हाच्या २२ गोण्या पोलिसांना मिळाल्या. चेंबूर पोलिसांनी त्याची महिती चेंबूर शिधावाटप अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात येऊन टेम्पोमध्ये असलेल्या धान्याची तपासणी केली असता ते धान्य शिधावाटप दुकानातील असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी याबाबत दोन्ही टेम्पो चालकांकडे चौकशी केली असता, सिद्धार्थ कॉलनी येथील दुकान क्रमांक ३३ ई ९८ या दुकानातून हे धान्य घेऊन जात असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार शिधावाटप अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून चेंबूर पोलिसांनी शिधावाटप दुकानाच्या मालक हिराबाई गांगुर्डे आणि दोन्ही टेम्पो चालकांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

