मुंबई : चेंबूरमध्ये रस्त्यालगत वाहन उभे करण्यासाठी टँकरचालकांकडून खंडणी उकळण्यात येत असल्याचा प्रकार उडकीस आला आहे. या प्रकरणी काही टँकरचालकांनी तक्रार केल्यानंतर आरसीएफ पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

चेंबूरमधील माहुल गाव, गडकरी खाण या परिसरात बीपीसीएल, एचपीसीएल, तसेच काही खासगी तेल आणि गॅस कंपन्या आहेत. या कंपन्यामधून दररोज मोठ्या प्रमाणात कच्चा मालाची ने-आण केली जाते. त्यामुळे या कंपन्याबाहेर दररोज मोठ्या संख्येने टँकर उभे असतात. काही माफीया या टँकरचालकांकडून वाहन रस्त्यालगत उभे करण्यासाठी खंडणी वसूल करीत आहेत. टँकर चालकांकडून दिवसभर वाहन उभे करण्यासाठी पाचशे रुपये उकळले जातात. त्याला विरोध करणाऱ्या टँकरचालकांना धमकावण्यात येते. तसेच काही वेळा त्यांना मारहाणही करण्यात येत.

एका टँकर चालकाने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे या माफियांनी गुरुवारी त्याला ठार मारण्याची धमकी दिली. ही बाब टँकरचालकाने मालकाला सांगितल्यानंतर त्यांनी या प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे या प्रकरणी हितेंद्र ठाकूर आणि इम्रान हुसेन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गेल्या काही वर्षांत वाहने उभी करण्यासाठी पैसे उकळणाऱ्या माफियांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी टँकरचालकांकडून करण्यात येत आहे.