मुंबई: शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या बसवर झाड पडल्यामुळे चेंबूरमध्ये आक विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेत बुधवारी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये तीव्र पडसाद उमटले. सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामात झाडाची मुळे कापल्याबद्दल उद्यान विभागाने रस्ते विभागाला पत्र पाठवून कळवल्यानंतरही वर्षभर काहीच कारवाई न केल्याची माहिती सभागृहनेते गणेश खणकर यांनी सभागृहाला दिली. तेव्हा पालिकेच्या अधिकाऱ्यांना माणुसकी शिकवण्याची गरज असल्याची भावना काही सदस्यांनी व्यक्त केली. याप्रकरणी जबाबदारी अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन करावे व त्रयस्थामार्फत चौकशी करावी असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले.
चेंबूरमध्ये मंगळवारी दुपारी शाळा सुटण्याच्यावेळी एक भलेमोठे पिंपळाचे झाड शाळेच्या बसवर कोसळून झालेल्या अपघातात एका ११ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू ओढवला. या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आली. तत्पूर्वी स्थायी समितीच्या सदस्यांनी झाड कोसळण्याच्या या प्रकरणाची चौकशी करण्याची व जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. सभागृहनेते गणेश खणकर यांनी सभा तहकूबीचा प्रस्ताव मांडला. तेव्हा पालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा नमुनाच सभागृहाला सादर केला. दुर्घटनेत जे झाड कोसळले त्या झाडाबाबत एम पश्चिम विभागाच्या उद्यान अधिकाऱ्यांनी रस्ते विभागाला पत्र लिहिले होते.
कंत्राटदाराने रस्त्याचे काम करताना झाडाच्या बुंध्यालगत खोदकाम केल्यामुळे मुळांना इजा झाली आहे. तसेच मुळे कापली गेल्यामुळे झाड पावसाळ्यात उन्मळून पडण्याची शक्यता असल्याचे या पत्रात म्हटले आहे. मात्र यावर वर्षभर काहीच कारवाई केली नसल्यामुळे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे मत खणकर यांनी व्यक्त केले.
यावेळी झालेल्या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सगळ्या नगरसेवकांनी सहभाग घेतला. या प्रकरणातील कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे यशोधर फणसे यांनी केली. एका पत्राचे उत्तर द्यायला, त्यावर कारवाई करायला दीड वर्ष का लागते, अधिकारी रस्त्यावर उतरतात की नाही असा सवाल शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांनी उपस्थित केला. तर वडाळ्यातील एका शाळेबाहेरच्या झाडाचीही अशीच अवस्था असून कधीही अशी दुर्घटना तिथे होऊ शकते असा मुद्दा शिवसेना (शिंदे) पक्षाचे गटनेते अमेय घोले यांनी उपस्थित केला. तर पालिकेच्या अधिकाऱ्यांना माणुसकी शिकवण्याची गरज आहे का असा सवाल काँग्रेसच्या ट्युलिप मिरांडा यांनी उपस्थित केला. तर अधिकारी आणि कंत्राटदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आरोग्य समिती अध्यक्ष हरिश भांदिर्गे यांनी केली.
महापौर एक लाख झाडे लावणार… पण आधी असलेल्या झाडांचे काय
महापौर रितू तावडे यांनी मुंबईत एक लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. मात्र आधीच मुंबईत असलेल्या झाडांच्या देखभालीचे काय असा मुद्दा काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी उपस्थित केला.
त्रयस्थ संस्थेकडून चौकशी
या प्रकरणात अक्षम्य हलगर्जीपणा पालिकेच्या यंत्रणेकडून झाल्याचे मान्य करीत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रकरणाची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले. तसेच हा केवळ अपघात किंवा नैसर्गिक आपत्ती असे न समजता प्रशासकीय निष्काळजीपणा असल्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचेही आदेश अध्यक्षांनी दिले.
