कझाकस्थान येथे पार पडलेल्या १२ व्या आशियाई जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत चेंबूरमधील झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांनी १४ पदके पटकावली असून त्यात पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि सात कांस्य पदकांचा समावेश आहे.

हेही वाचा- Mobile Ticketing App : प्रवाशांची मोबाइल तिकीट ॲपला पसंती

चेंबूरमधील जवाहर नगर परिसरातील लोकमान्य शिक्षण संस्थेचे शरद आचार्य क्रीडा केंद्र आणि श्री. नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेत १९९७ पासून विद्यार्थ्यांना जिम्नॅस्टिकचे धडे देण्यात येत आहेत. येथे प्रशिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विविध पदके पटकावली आहेत. तसेच १२ जणांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारही मिळाला आहे. चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील झोपडपट्टीत वास्तव्यास असलेले काही विद्यार्थ्यांना येथे जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षण घेत होते.

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर शिवडी-वरळी उन्नत मार्ग प्रकल्पाला गती

कझाकस्थानमध्ये पार पडलेल्या १२ व्या आशियाई जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी येथील १४ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. अत्यंत हालाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या या विद्यार्थ्यांना दानशुरांनी मदतीचा हात दिल्यामुळे या स्पर्धेत सहभागी होता आले. ही स्पर्धा २३ ते २८ सप्टेंबरदरम्यान पार पडली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी १४ पदके पटकावली. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.