मुंबई: चेंबूरमधील सुभाष नगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून जखमी झालेल्या आणखी एका कामगाराचा बुधवारी मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या तीनवर पोहोचली असून जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक, तर दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चेंबूरमधील सुभाष नगर परिसरातील इमारत क्रमांक ३६ च्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी सहा कामगार आठव्या मजल्यावर बांधण्यात आलेल्या परांचीवर उभे राहून काम करत होते. त्याच वेळी अचानक ही परांची तुटली आणि सहा कामगार आठव्या मजल्यावरून खाली पडले. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दल आणि चेंबूर पोलिसांना तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी कामगारांना तत्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच रामनजेनेल्लु हणुमंता देशपोगु (५६) याचा मृत्यू झाला. इतर पाच जणांपैकी एकाची प्रकृती गंभीर होती. यापैकी काही कामगारांना शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
शीव रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विजय मौर्य याचा १ मार्च रोजी मृत्यू झाला. तर गंगाधर राय (२२) याचा बुधवारी शीव रुग्णालयात उपचारादरम्या मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. शीव रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कुश रायची (३०) प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर संदीप राय (२७) आणि रमेश राय (२५) यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
