मुंबई : चेंबूरमध्ये टँकरमधून बेंझिनची गळती झाल्याची घटना ताजी असतानाच मुलुंड पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्गावर वैशाली नगर परिसरात ग्लेशियल ऍसिटिक ऍसिड वाहून नेणारा टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या कट्ट्यात अडकून तिरका झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. टँकर अडकल्याची माहिती रात्री ८.५२ वाजता मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि संबंधित विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
वाहन मागे घेत असताना ऍसिटिक ऍसिडचा टँकर झाडाच्या कट्ट्यात अडकला होता. टँकरमधून कोणत्याही प्रकारची ऍसिड गळती झाल्याचे आढळून आले नाही. खबरदारीचा उपाय म्हणून बचावकार्य हाती घेण्यात आले. हायड्रा मशीनच्या सहाय्याने टँकर यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आला.
बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर संबंधित टँकर तसेच त्यातील ऍसिड दुसऱ्या टँकरमध्ये उतरविण्यात आले. दोन्ही टँकर बीपीसीएलच्या ठिकाणी हलविण्यात आले. बाधित रस्त्याचा भाग पाण्याचा उच्च दाबाचा फवारा मारून धुवून स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून परिसरातील परिस्थिती सामान्य आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. घटनास्थळी ऍसिडची कोणतीही गळती झाली नसल्याने मोठा धोका टळला.
