मुंबई : चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेप्रकरणी महापालिकेने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून दुर्घटनेचे कारण स्पष्ट झालेले नाही. तसेच, या अहवालात समितीने उद्यान विभाग व रस्ते विभाग यांचा दोष नसल्याचे सांगत त्यांना क्लीन चिट दिली आहे. तसेच, झाडांची सुरक्षितता आणि रस्त्यांच्या देखरेखीसाठी नेमलेल्या कंत्राटदारास अनुक्रमे ५ लाख व २ लाख रुपयांचा दंड करण्याची शिफारस चौकशी समितीने केली आहे. एका निष्पाप जीवाचा बळी जाऊनही याप्रकरणी कोणीच दोषी आढळलेला नाही. तसेच, याप्रकरणी ज्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते, त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली जाण्याची शक्यता आहे.
चेंबूर पश्चिम परिसरात शाळेच्या बसवर ३० जून रोजी दुपारी भलेमोठे पिंपळाचे झाड उन्मळून पडले. त्यात विहान श्रीवास्तव (११) या मुलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरुषोत्तम माळवदे व उपआयुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे यांची समिती गठित केली होती. या समितीने उद्यानविद्या व लॅण्डस्केप सल्लागार रॉबर्ट फर्नांडिस यांच्या सोबत ३ जुलै रोजी घटनास्थळाची संयुक्त पाहणी करून सविस्तर अहवाल तयार केला आहे. नियुक्त केलेल्या चौकशी समितीने महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना नुकताच अहवाल सादर केला.
महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने मान्सूनपूर्व झाडांची आवश्यकतेनुसार छाटणी केली. तसेच, चेंबूर येथील संबंधित झाडाजवळ पर्जन्यजलवाहिनीचे जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान काम सुरू होते. या कामांबाबत उद्यान विभागाने रस्ते विभागाला वेळोवेळी कळविले होते. त्यामुळे या दुर्घटनेत उद्यान विभागाचा सकृतदर्शनी कोणताही दोष दिसून येत नसल्याचे समितीने अहवालात नमूद केले आहे. तसेच, अस्तित्वात असलेल्या झाडालगत पर्जन्यजलवाहिनीचे काम करताना ते झाड पर्जन्यजलवाहिनीत अडथळा ठरत होते. त्यामुळे तेथे पाणी तुंबण्याची शक्यता होती. पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी, पर्जन्यजलवाहिनीची सातत्यता ठेवण्यासाठी आणि झाड वाचविण्यासाठी झाडाचा परिघ सोडून रस्ते विभागाने सुरक्षित अंतर ठेवून पर्जन्यजलवाहिनीचे बांधकाम केले. जेणेकरून त्या ठिकाणी पर्जन्यजलवाहिनीचे पाणी तुंबणार नाही. त्यामुळे रस्ते विभागाने योग्य ती काळजी घेतल्याचे निदर्शनास आले असून याप्रकरणी रस्ते विभागाचाही कोणताही दोष दिसून येत नाही, असे चौकशी समितीने अहवालात नमूद केले.
उद्यान विभागाने झाडांच्या सुरक्षिततेबाबत रस्ते विभागाला ९ एप्रिल २०२५ व २७ जानेवारी २०२६ रोजी कळविले होते. त्यानुसार रस्ते विभागाने याबाबत संबंधित कंत्राटदार मे. गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांना ९ मार्च रोजी सूचित केले होते. मात्र, कंत्राटदाराने पुरेशी खबरदारी घेतली नसल्याचे आढळून आले. वनस्पतीशास्त्र/उद्यानशास्त्र तज्ज्ञ, उद्यानविद्या व लॅण्डस्केप सल्लागार यांनी संबंधित झाड पडल्याबाबत त्यांच्या अहवालात विषद केलेली विविध कारणे आणि ते झाड पडल्यापासून म्हणजेच २८ जून ते ५ जुलै या कालावधीत मुंबईमधील विविध रस्त्यांवरील तसेच उद्यानातील मोकळ्या जागांवरील सुमारे १ हजार १५८ झाडे/फांद्या पडल्याच्या अनेक घटना घडल्या. ही बाब समितीने विचारात घेऊन कंत्राटदार मे. गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांना पूर्णपणे दोषी धरणे उचित होणार नाही, असे स्पष्ट केले. मात्र, रस्ते विभागाने गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांना झाडाजवळील उत्खनन करताना काळजी घेण्याबाबत तसेच काम करताना कोणतीही घटना किंवा नुकसान झाल्यास त्या सर्व परिणामांसाठी कंत्राटदार पूर्णपणे जबाबदार असेल, असे पत्र पाठविले होते. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे होते. मात्र, अहवालात नमूद केलेल्या कारणांपैकी कंत्राटदाराने पुरेशी खबरदारी न घेणे हे एक कारण असू शकते, असे सांगत कंत्राटदाराला ५ लाख रुपयांचा दंड करण्याचे समितीने अहवालात नमूद केले आहे.
रस्ते विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार, या कामावर देखरेख, निरीक्षण तसेच तांत्रिक पर्यवेक्षणासाठी मे. माहिमतुरा कन्सल्टंट यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या कामाच्या व्याप्तीनुसार त्यांनीही वेळोवेळी कंत्राटदाराला योग्य त्या सूचना देऊन झाडांची स्थिरता अबाधित राखणे गरजेचे होते. अहवालात नमूद केल्याप्रमाणे झाड पडण्याबाबतच्या विविध संभाव्य कारणांपैकी सल्लागारांनी पुरेशी खबरदारी न घेणे हे एक कारण असू शकते व कंत्राटदाराच्या कामावर पुरेशी देखरेख ठेवून त्यातील त्रुटी निदर्शनास आणून देण्याची खबरदारी मे. माहिमतुरा कन्सल्टंट यांनी घेणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांना २ लाख रुपयांचा दंड करण्याची शिफारस समितीने केली.
