मुंबई : चेंबूर झाड दुर्घटनेच्या पहिल्या अहवालावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेली टीका आणि महापौर रितू तावडे यांनी फेटाळलेला अहवाल या पार्श्वभूमीवर या घटनेची फेरचौकशी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार फेरचौकशीसाठी महापालिकेने वनस्पती शास्त्राचे तज्ज्ञ व माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांची एकसदस्यीय समिती म्हणून नेमणूक केली आहे. एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश त्रयस्थ समितीला दिले आहेत.

चेंबूर परिसरातील डायमंड उद्यानाजवळ एका शालेय बसवर पिंपळाचे झाड कोसळून ११ वर्षीय विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झाला. तसेच, दुर्घटनेत अन्य चार विद्यार्थी जखमी झाले होते. या घटनेच्या चौकशीसाठी महापालिकेने नेमलेल्या समितीने अहवाल सादर केला. मात्र, त्यात रस्ते विभाग आणि उद्यान विभागाला निर्दोषत्व देण्यात आले.

तसेच, सल्लागार व कंत्राटदाराला किरकोळ दंड करण्याची शिफारस करून त्यांनाही दिलासा दिला. एकूणच संपूर्ण प्रकरणात एकही जण दोषी आढळला नसल्याचे अहवालात नमूद केले होते. या अहवालावर आणि महापालिकेवर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनीही आक्रमक भूमिका घेत अहवालाचा निषेध केला. दरम्यान, महापौर रितू तावडे व महापालिका सभागृहाने हा अहवाल मान्य नसल्याचे सांगत पुन्हा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

दुर्घटनेचे गांभीर्य पाहता सखोल तपास, सक्त कारवाई व कठोर दंडात्मक शिफारशींचा अभाव असल्याने त्रयस्थ व तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करून फेरचौकशी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार आता या दुर्घटनेप्रकरणी फेरचौकशी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने वनस्पतीशास्त्रतज्ज्ञ तथा माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांची एकसदस्यीय समिती म्हणून नेमणूक केली आहे.

समितीला चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे, स्थळ भेटीच्या वेळी उपस्थित राहणे याबाबत सर्व संबंधित विभागप्रमुखांना आदेश देण्यात येतील. समितीस अहवाल सादर करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य संबंधित विभागाकडून करण्यात येईल, असेही महानगरपालिका प्रशासनाने नियुक्ती पत्रात नमूद केले आहे.

डॉ. संजय व्ही. देशमुख हे वनस्पतीशास्त्रतज्ज्ञ आहेत. त्यांनी कांदळवने (मॅनग्रोव्हज्) या विषयात काम केले आहे. तसेच, त्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु म्हणूनही काम केले आहे. सध्या ते इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी (मुंबई) येथे अधिवक्ता प्राध्यापक, तसेच एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई येथे उपाध्यक्ष पदावरही कार्यरत आहेत. त्यांचा या क्षेत्रातील अनुभव व कार्य विचारात घेऊन, त्यांची या चौकशी समितीसाठी नियुक्ती केली आहे. दुर्घटनेबाबतच्या विविध बाबींचा अभ्यास करून एका महिन्यात ते महापालिकेला अहवाल सादर करतील.

फेरतपासणीत या बाबींचा अभ्यास होणार

१) प्राथमिक चौकशी समितीने वापरलेल्या कार्यपद्धतीचे परीक्षण

२) प्राथमिक चौकशी समितीने सादर केलेल्या पुराव्यांचे स्वतंत्र विश्लेषण

३) अभियांत्रिकी, वनस्पतीशास्त्र, पर्यावरण शास्त्र, जलनिःसारण, मलनिःसारण, रस्ता बांधणी, हवामान, मृदाशास्त्र व सार्वजनिक प्रशासन या दृष्टिकोनातून प्राथमिक चौकशी अहवालाचे चिकित्सक मूल्यमापन

४) प्राथमिक चौकशी निरीक्षणाचे वैज्ञानिक परीक्षण

५) घटनेच्या मूळ कारणाचे स्वतंत्र विश्लेषण

६) प्राथमिक चौकशी समितीने सूचविलेल्या अंतरिम उपाययोजनांचे मूल्यांकन

७) अहवालातील शिफारशींचे समीक्षात्मक परीक्षण

८) महानगरपालिकेस सादर करण्यासाठी स्वतंत्र अर्थबोधक मूल्यांकन अहवाल

९) भविष्यातील धोरणात्मक सुधारणा सुचविणे