मुंबई : गेल्या आठवड्यात चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विहान श्रीवास्तव या शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेचा अहवाल चौकशी समितीने पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्याकडे सादर केला. यामध्ये झाडांच्या संरक्षणासाठी महत्त्वाच्या सुधारणा सुचवल्या आहेत. तसेच रस्ते व इतर पायाभूत प्रकल्पांदरम्यान झाडांच्या मुळांचे नुकसान झाल्यास संबंधित कंत्राटदार आणि काम करणाऱ्या महापालिका विभागाला थेट जबाबदार धरण्याची शिफारस करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात मंगळवारी चेंबूर येथे पिंपळाचे झाड शाळेच्या बसवर पडून झालेल्या अपघातात एका शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पावसाळ्यात पडणाऱ्या झाडांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यंदा पावसाळ्यात केवळ आठ दिवसांत तब्बल एक हजाराहून अधिक झाडे व झाडांच्या फांद्या कोसळल्या आहेत. चेंबूर दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिका प्रशासनाने तीन अभियंत्यांना निलंबित केले. तसेच या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला आहे.
या आहेत शिफारशी…
समितीने भविष्यातील सर्व महापालिका निविदांमध्ये झाडांच्या, विशेषतः मुळांच्या, संरक्षणाची जबाबदारी स्पष्ट करणारी अट समाविष्ट करण्याची सूचना केली आहे. सध्या अशा प्रकारची अट निविदांमध्ये नसल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. तसेच कोणतेही रस्ते, कोणत्याही वाहिन्या किंवा अन्य पायाभूत कामे सुरू करण्यापूर्वी झाडांच्या मुळांवर होणाऱ्या परिणामाचे वैज्ञानिक मूल्यमापन बंधनकारक करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासाठी आर्बोरिस्ट (वृक्षतज्ज्ञ) आणि ट्री सर्जन यांची नियुक्ती करून कामांवर देखरेख ठेवण्याचाही प्रस्ताव आहे.
नागरिकांचा सहभाग घेणार…
याशिवाय नागरिकांच्या सहभागातून झाडांचे संवर्धन करण्यासाठी ‘वृक्षमित्र’ उपक्रम सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी परिसरातील झाडांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून महापालिकेला सहकार्य करावे, असा या उपक्रमाचा उद्देश आहे.
दरम्यान, ऑक्टोबर २०२३ ते मार्च २०२६ या कालावधीत रस्ते व विविध पायाभूत कामांदरम्यान झाडांच्या मुळांचे नुकसान झाल्याप्रकरणी रस्ते विभाग आणि विविध यंत्रणांना ४२८ नोटिसा बजावण्यात आल्या. याच काळात २,६१५ झाडांच्या मुळांचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. चेंबूर दुर्घटनेच्या प्राथमिक तपासातही झाडाची मुख्य मुळे कमकुवत झाल्याचे आढळले.
यंदा मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळली…
यंदा पावसाळ्यात मुंबईत झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच सुमारे १,२०० झाडे कोसळली असून ही संख्या २०२५ च्या पावसाळ्यातील ८५५ घटनांच्या तुलनेत सुमारे ३० टक्के अधिक आहे. २०२३ ते ५ जुलै २०२६ दरम्यान झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये सुमारे ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
