मुंबई: चार वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर घरोघरी ऑनलाईन सामान पोहचवत कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेचा शुक्रवारी चेंबूर येथे अपघातात निधन झाले. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली. आरसीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणी टँकर चालकाला अटक केली.

चेंबूरमधील वाशीनाका परिसरात वास्तव्यास असलेल्या लक्ष्मी नांदगावकर (३५) यांच्या पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. पदरातील दोन लहान मुलींचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी पतीची दुचाकी चालवण्यास सुरुवात केली. घरोघरी जाऊन ऑनलाईन सामान पोहोचविण्याचे काम त्या करू लागल्या. घरोघरी फिरण्यासाठी त्या दुचाकीचा वापर करीत होत्या. नेमहमीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी काही सामान घेऊन त्या चेंबूर कॉलनी येथून वाशीनाका परिसरात निघाल्या होत्या. सनातन शाळेसमोर अचानक त्यांचा दुचाकीवरून तोल गेला आणि त्या टँकरखाली आल्या.

घटनेची माहिती मिळताच आरसीएफ पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. आरसीएफ पोलिसांनी या प्रकरणी फरार टँकर चालक अरमान निषाद (३१) याला अटक केली. चेंबूरच्या आर.सी. मार्गावर गेल्या काही वर्षांत अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. त्यामुळे या मार्गावर कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.