एक्सरे फिल्म्स, केमिकल्स खरेदीचा
प्रस्ताव मागे घेण्याची प्रशासनावर नामुष्की
शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात गेले सात महिने रुग्णांना पालिकेच्या अनुसूचीवरील एक्सरे फिल्म्स आणि केमिकल्स रुग्णांना औषधांच्या दुकानांतून खरेदी करण्यास भाग पाडणारे वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची एकमुखी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी करण्यात आली. स्थायी समिती अध्यक्षांनीही या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर त्रुटी असलेला या संदर्भात सादर केलेला प्रस्ताव प्रशासनाला मागे घ्यावा लागला.
पालिकेची रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने इत्यादींना एक्सरे फिल्म्स, केमिकलचा पुरवठा करण्याबाबतचा एक प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत सादर केला होता. मात्र लोकमान्य टिळक रुग्णालयाने आवश्यक त्या एक्सरे फिल्म्स आणि केमिकल्सची सूची उपलब्ध न केल्यामुळे आता फेरनिविदा काढाव्या लागणार आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव मागे घेण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. मात्र लोकमान्य टिळक रुग्णालयातील या साहित्याचा साठा संपुष्टात आला आहे. रुग्णांना एक्सरे फिल्म्स आणि केमिकल्स औषधांच्या दुकानातून खरेदी करण्यास सांगण्यात येत आहे. या वस्तूंचा साठा संपुष्टात येत असल्याचे रुग्णालयांतील डॉक्टरांना माहिती होते. मात्र तरीही तो खरेदी करण्यात विलंब झाला आहे.
या प्रकरणाची कसून चौकशी करावी, अशी मागणी करीत समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी या प्रश्नाला वाचा फोडली. लोकमान्य टिळक रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांचे औषधाच्या दुकानदारांशी साटेलोटे आहे. त्यामुळेच हा प्रकार घडला असून या प्रकरणी या रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अपक्ष नगरसेवक विष्णू गायकवाड यांनी या वेळी केली.