मुंबई : मुंबईमध्ये पार पडलेल्या दिमाखदार चेतक स्क्रीन पुरस्कार सोहळा २०२६मध्ये गेल्या वर्षी सर्वाधिक कमाई करणार्‍या ‘धुरंधर’ चित्रपटाने बाजी मारली. नीरज घायवानच्या ‘होमबाउंड’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला, तर ‘धुरंधर’ने सर्वोत्तम दिग्दर्शक, सर्वोत्तम अभिनेता यासह १३ पुरस्कार जिंकले.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार धुरंधर चित्रपटासाठी अभिनेता रणवीर सिंगने जिंकला, तर अभिनेत्री यांनी गौतम हिने हक चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला. त्याबरोबर अक्षय खन्नाने सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्यासाठी पुरस्काराची बाहुली मिळवली. या सोहळ्याबरोबरच स्क्रीन पुरस्कारांनाही दमदार पुनरागमन केले. सर्वोत्तम चित्रपटांसाठी ‘होमबाउंड’ बरोबर ‘धडक २’, ‘धुरंधर’, ‘हक’, सैयारा, सितारे जमीन पर, सुपरबॉइज ऑफ मालेगाव आणि

छावा या चित्रपटांमध्ये चुरस होती. त्यापाठोपाठ सर्वोत्तम दिग्दर्शनासाठी धुरंधरसाठी आदित्य धरसह लक्ष्मण रामचंद्र उतेकर (छावा), सुपर्ण एस. वर्मा (हक), नीरज घायवान (होमबाउंड), राम रेड्डी (जुगनुमा – द फेबल), मोहित सुरी (सैयारा) आणि रीमा कागती (सुपरबॉइज ऑफ मालेगाव) यांच्यात स्पर्धा होती.

धुरंधरसाठी अक्षय खन्नाला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या श्रेणीमध्ये धुरंधरसाठी राकेश बेदी, गुस्ताख इश्कसाठी नसिरुद्दीन शाह, जॉली एलएलबी ३साठी सौरभ शुक्ला आणि जुगनुमा – द फेबलसाठी दीपक डोब्रियाल असे इतर बलाढ्य कलाकार स्पर्धेत होते. मात्र, राज बब्बर यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी अक्षय खन्ना उपस्थित नव्हता.

होमबाउंड चित्रपटासाठी शालिनी वत्सला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तिने विकी कौशलकडून स्क्रीनची बाहुली स्वीकारली. होमबाउंड चित्रपटाचा भाग असल्याबद्दल आनंद व्यक्त करत तिने चित्रपटाच्या संपूर्ण संघाला पुरस्कार समर्पित केला.

ओटीटी चित्रपटांच्या विभागात स्टोलनने सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम दिग्दर्शक आणि सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार पटकावले. निर्माते करण तेजपाल, गौरव धिंग्रा आणि स्वप्नील साळकर यांनी सौरभ शुक्ला आणि गुनीत मोंगा यांच्या हस्ते तर दिग्दर्शक करण तेजपालने शुजित सरकार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.

सर्वोत्तम दिग्दर्शकासाठी पुरस्काराच्या स्पर्धेत मिसेसची आरती कडव, रात अकेली है – द बन्सल मर्डर्सचा हनी त्रेहान, द ग्रेट शमसुद्दीन फॅमिलीसाठी अनुशा रिझवी आणि द मेहता बॉइजसाठी बोमन इराणी हे होते. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेल्या अभिषेक बॅनर्जीने मनोज बाजपेयी (इन्स्पेक्टर झेंडे), अभिषेक बच्चन (कालीधर लापता), नवाजुद्दीन सिद्दिकी (रात अकेली है – द बन्सल मर्डर्स) आणि शुभम वर्धन (स्टोलन) यांच्याबरोबरच्या स्पर्धेत बाजी मारली.

सर्वोत्तम अभिनेत्रीच्या (ओटीटी) पुरस्कारासाठी मिसेसमधील भूमिकेसाठी सान्या मल्होत्राने बाजी मारली. फातिमा सना शेख (आप जैसा कोई), राधिका आपटे (सिस्टर मिडनाईट), सबा आझाद (साँग्ज ऑफ पॅराडाइज), मिया मेलझर (स्टोलन), फरीदा जलाल (द ग्रेट शमसुद्दीन फॅमिली) आणि श्रेया चौधरी (द मेहता बॉइज) या अभिनेत्री पुरस्कारासाठी स्पर्धेत होत्या.

अन्य पुरस्कार

सर्वोत्तम गीतकार – गुलझार (उल जुलूल इश्क – गुस्ताख इश्क) 

सर्वोत्तम गीत – तू पास है (सैयारा)

सर्वोत्तम गायक – फहीम अब्दुल्ला (तू पास है – सैयारा)

सर्वोत्तम गायिका – श्रेया घोषाल (तू पास है – सैयारा)