‘महाराष्ट्र सदन’ बांधकाम घोटाळा आणि कलिना येथील भूखंड व्यवहार प्रकरणावरून अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत आपल्यावरील सर्व आरोप पुन्हा एकदा फेटाळून लावले. या दोन्ही प्रकरणांसह इतर कोणत्याही विषयामध्ये कसलाही भ्रष्टाचार झालेला नसून, कोणतीही अनियमितता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तपासाला आपण आतापर्यंत पूर्ण सहकार्य केले असून, पुढील काळातही सहकार्य करू, असे त्यांनी स्पष्ट केले. छगन भुजबळ यांचे मंगळवारी अमेरिकेहून मुंबईत आगमन झाले. यावेळी मुंबई विमानतळावर त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी करत घोषणाबाजी केली. भुजबळ यांनी यावेळी कार्यकर्त्यांचे आभार मानताना मी कोणतीही चूक केली नसल्याचे सांगितले. भुजबळ कुटुंबीय चौकशी यंत्रणांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे. कोणत्याही कायदेशीर कारवाईला सामोरा जाण्यास तयार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. समर्थकांनी शांतता बाळगावी, असेही आवाहन त्यांनी केले. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, महाराष्ट्र सदन बांधकाम आणि कलिना येथील भूखंड व्यवहारात सर्व निर्णय नियमाला धरून घेण्यात आले आहेत. या निर्णयांना मंत्रिमंडळाच्या उपसमितीने मान्यता दिली आहे. संबंधित सर्व खात्यांच्या सचिवांनीही त्याला मान्यता दिली आहे. मग यामध्ये भ्रष्टाचार कसा झाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या चौकशीला आम्ही आतापर्यंत सामोरे गेलो आहोत. पुढील काळातही जाऊ. मी चौकशीला घाबरून कुठेही पळून जाण्याचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्र सदन प्रकरणात जूनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. जर पळून जायचे असते, तर आतापर्यंत थांबलोच नसतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने भुजबळपुत्र पंकज यांना चौकशीसाठी आज पाचारण केले आहे. त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्यास समीर यांच्याप्रमाणेच त्यांनाही अटक होऊ शकते, असे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. तर गेल्या आठवड्यात अटक झालेल्या समीर भुजबळ यांची २२ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. समीरला अटक झाली त्याच्या आदल्याच दिवशी छगन भुजबळ हे अमेरिकन काँग्रेसमध्ये भाषण करण्याकरिता वॉशिंग्टन डीसीला रवाना झाले होते. WATCH: Chhagan Bhujbal arrives at Mumbai airport after his visit to USA. — ANI (@ANI_news) February 9, 2016