scorecardresearch

छगन भुजबळांना घरच्या जेवणाची परवानगी

वैद्यकीय सुविधाही मिळणार; २७ एप्रिलपर्यंत कोठडीत वाढ

Chhagan bhujbal , ED , Maharashtra sadan, scam, NCP, Mumbai, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
छगन भुजबळ

वैद्यकीय सुविधाही मिळणार; २७ एप्रिलपर्यंत कोठडीत वाढ
महाराष्ट्र सदन आणि अन्य आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत विशेष न्यायालयाने बुधवारी २७ एप्रिलपर्यंत वाढ केली. त्याचवेळेस भुजबळ यांना घरचे जेवण, आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा आणि झोपण्यासाठी गादी उपलब्ध करून देण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.
सध्या आर्थर रोड कारागृहात असलेल्या भुजबळ काका-पुतण्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने बुधवारीही त्यांना ‘व्हिडीओ कॉन्फरन्िंसग’द्वारे विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. भुजबळ काका-पुतण्यांविरोधातील आरोपांची चौकशी अद्यापही सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) न्यायालयाकडे केली.
त्याला भुजबळ यांचे वकील अभय मोकाशी यांनी तीव्र विरोध केला. हा घोटाळा ८४० कोटी रुपयांचा असल्याचा दावा ‘ईडी’कडून करण्यात येत आहे. मात्र ६० दिवस समीर यांना कोठडीत ठेवल्यानंतरही ‘ईडी’ला आतापर्यंत केवळ १३१ कोटी रुपयांचाच छडा लावता आला आहे. भुजबळ यांना अटक करण्यासाठीच खोटय़ा आकडेवारीचा घाट ‘ईडी’ने घातल्याचा आरोप मोकाशी यांनी केला. परंतु न्यायालयाने ‘ईडी’ची विनंती मान्य करत भुजबळ काका-पुतण्यांच्या कोठडीत २७ एप्रिलपर्यंत वाढ केली.

घरचे जेवण, झोपताना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने श्वास घेणारे उपकरण आणि झोपण्यासाठी गादी उपलब्ध करून देण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती भुजबळ यांच्याकडून न्यायालयाकडे करण्यात आली होती. त्यांच्या या याचिकेवरही बुधवारी सुनावणी झाली. त्या वेळेस ‘ईडी’तर्फे भुजबळ यांच्या अर्जाला विरोध करण्यात आला. तसेच कारागृह प्रशासनाकडून त्यांची योग्य ती काळजी घेतली जात असल्याचा दावाही ‘ईडी’चे वकील हितेन वेणेगावकर यांनी केला. न्यायालयाने भुजबळांच्या या सगळ्या मागण्या अंशत: पूर्ण केल्या.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-04-2016 at 03:01 IST