‘एसीबी’च्या आरोपपत्रात छगन भुजबळांवर प्रमुख आरोप
मंत्रिमंडळ पायाभूत समितीच्या बैठकीत आयत्यावेळी विषय घुसवून माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या विकासाचा कथित प्रकल्प मंजूर करून घेतला, असा प्रमुख आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आरोपपत्रात करण्यात आल्याचे कळते. हे आरोपपत्र न्यायालयात सादर झाले असले तरी ते न्यायालयाने दाखल करून घेतलेले नाही. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत समितीने अंधेरी आरटीओ प्रकल्प मंजूर करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आपण कसे जबाबदार, असा सवाल सतत करणाऱ्या भुजबळ यांना एसीबीने चपराक दिली आहे.
तब्बल २२ हजार पानांचे आरोपपत्र अद्याप भुजबळासंह इतरांना देण्यात आलेले नाही. मात्र यापैकी काही भाग उपलब्ध झाला असून या आरोपपत्रात मे. चमणकर इंटरप्राईझेस हे २५ कोटींपेक्षा अधिक काम करण्यासाठी नोंदणीकृत कंत्राटदार नसतानाही भुजबळांनी त्यांना अनुकूल भूमिका घेतली. या बदल्यात मे. चमणकर यांच्या वतीने मे. प्राईम डेव्हलपर्सकडून साडेतेरा कोटी रुपये मिळाले, असा आरोप ठेवण्यात आला आहे.
मे. चमणकर इंटरप्राईझेस यांच्याकडून थेट रक्कम न घेता त्याऐवजी दादर येथील साईकुंज इमारतीच्या पुनर्विकासाचे काम भुजबळ यांच्या कंपनीने घेतले. हे काम मे. चमणकर इंटरप्राईझेसने मे. प्राईम डेव्हलपर्सला विकासासाठी दिले. या इमारतीचा पुनर्विकास झालाच नाही. तरीही भुजबळ यांनी पैसे घेतले.

आरोपपत्रात नेमके काय आहे?
* मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार हजार चौरस मीटरचा भूखंड मे. चमणकर इंटरप्राईझेसला मंजूर करण्यात आला. परंतु या मोबदल्यात कोणती कामे करावयाची याचा भुजबळांनी उल्लेख केला नाही. त्यामुळे शासनाचे सहा कोटींचे नुकसान.
* इतर प्रकल्पांतील तरतुदीनुसार ३५ टक्के फंजीबल चटईक्षेत्रफळ गृहीत न धरल्याने शासनाला ७२ कोटी ७७ लाखांचे नुकसान.
* २१ हजार चौरस मीटर इतके कायमस्वरुपी संक्रमण शिबिराचे बांधकाम करावयाचे होते. परंतु त्याऐवजी चटईक्षेत्रफळाची खुल्या बाजारात विक्री केल्यामुळे शासनाला १०६ कोटींचे नुकसान.
* विकासकाला २० टक्के फायदा करून देण्याची मुभा. परंतु प्रत्यक्षात विकासकाला ८१.०९ टक्के फायदा करून दिला.
* गेल्या नऊ वर्षांत सर्व कामे मे. चमणकर इंटरप्राईझेसने पूर्ण केलेली नाहीत. दोन वर्षांत १४ हजार चौरस मीटर बांधकाम पूर्ण करावयाचे होते.