भाजी विक्रेता ते महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, जाणून घ्या छगन भुजबळांचा ‘वादळी प्रवास’

महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकाराणात तळागाळात काम करुन नेता बनणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. आज वडिल, भाऊ, काका यांच्या पुण्याईवर अनेक तरुण आमदार, खासदार बनून थेट विधानसभा, लोकसभेत पोहोचले आहेत.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकाराणात तळागाळात काम करुन नेता बनणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. आज वडिल, भाऊ, काका यांच्या पुण्याईवर अनेक तरुण आमदार, खासदार बनून थेट विधानसभा, लोकसभेत पोहोचले आहेत. पण छगन भुजबळ मात्र अशा राजकारणाला अपवाद आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे. समाजाच्या तळागाळात पोहोचून भुजबळांनी स्वत: ओळख बनवली.

कसा आहे भुजबळांचा राजकीय प्रवास

– ओबीसी समाजाचे नेते अशी छगन भुजबळ यांनी आज आपली ओळख प्रस्थापित केली असली तरी त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेपासून झाली.

– राजकारणात येण्यापूर्वी छगन भुजबळ भायखळा मार्केटमध्ये भाजी विक्रेते होते. भुजबळ स्वत: उच्चशिक्षित आहेत. त्यांनी माटुंग्याच्या VJTI मधून मॅकेनिकल इंजिनियरींगमध्ये पदवी घेतली.

– त्यानंतर १९६० च्या दशकात त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. अल्पावधीत त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास संपादन केला व शिवसेनेच्या वरच्या फळीच्या नेत्यांमध्ये स्थान मिळवले.

– शिवसेनेच्या विस्तारासाठी त्यांनी भरपूर कार्य केले. त्यांच्या याच धडाडीची दखल घेऊन शिवसेनेत त्यांना महत्वाची पदे देण्यात आली. शिवसेनेनेच त्यांना पहिल्यांदा मुंबईचा महापौर बनवले.

– १९७३ ते १९८४ या काळात मुंबई महापालिकेत शिवसेना विरोधी पक्षामध्ये होती. त्यावेळी भुजबळ महापालिकेत शिवसेनेची मुलखमैदानी तोफ होते. आपल्या धडाडीने त्यांनी महापालिकेत शिवसेनेचा एक दरारा निर्माण केला.

– छगन भुजबळ २५ वर्ष शिवसेनेमध्ये होते. शाखाप्रमुख ते मुंबईचा महापौर अशी पदे त्यांनी भूषवली.

– १९८५ साली ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर माझगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून विधानसभेवर गेले.

– १९९१ साली शिवसेना नेतृत्वाबरोबर मतभेद झाल्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

– शरद पवारांनी १९९९ साली काँग्रेसपासून फारकत घेऊन स्वत:चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी ते पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.

– १९९९ साली राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आले. त्यावेळी पहिल्यांदा भुजबळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. १८ ऑक्टोंबर १९९९ ते २४ डिसेंबर २००३ या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते.

– याच काळात त्यांच्यावर बनावट स्टॅम्प पेपर घोटाळयाचे आरोप झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डिसेंबर २००३ मध्ये एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर हल्ला केला. त्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

– २००४ मध्ये पुन्हा राज्यात सत्तेवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले. त्यावेळी भुजबळांकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. १ नोव्हेंबर २००४ ते २६ सप्टेंबर २०१४ पर्यंत सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. २००८ मध्ये त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री बनवण्यात आले.

– २००९ साली तिसऱ्यांदा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले. त्यावेळी भुजबळ उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. ८ डिसेंबर २००८ ते १० नोव्हेंबर २०१० या काळात ते राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा होते.

– काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या कार्यकाळात २००८ साली मुंबईवर २६/११ दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी आर.आर.पाटील यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याजागी भुजबळांची निवड करण्यात आली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chhagan bhujbal ncp leader political carrier