मला अटक होईल अशी चर्चा माझ्या कानावर येत होती. पण मी काही चुकीचे केले नव्हते त्यामुळे मला अटक होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. भ्रष्टाचार झालाच नाही तर माझ्या अटकेचा प्रश्न येतो कुठे अशी माझी समजूत होती असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी सांगितले. जवळपास दोन वर्ष महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात तुरूंगात असलेले भुजबळ नुकतेच जामिनावर बाहेर आले असून खटल्याच्या सुनावणीमध्ये खरं काय ते बाहेर येईल आणि आपण निर्दोष असल्याचे सिद्ध होईल असं त्यांनी म्हटलं आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामाच्या घोटाळा प्रकरणात मला अटक झाली असे सांगताना माझा काहीही संबंध नसताना अटक केल्याचा दावा भुजबळांनी केला. हे प्रकरण सांगताना भुजबळ म्हणाले की, “अंधेरीमध्ये झोपडपट्टी पुनक्वसन योजनेमध्ये चमणकर नावाच्या कंत्राटदाराला काम मिळाले होते. हा कंत्राटदार मी नेमलेला नाही. त्या झोपु योजनेशी माझा संबंध नाही. त्यावेळी या झोपडपट्टी मध्ये एक टेस्टिंग ट्रॅक होता, या ट्रॅकच्या संदर्भात त्या कंत्राटदाराला एफएसआय देण्यासंदर्भातला निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. माझा संबंध फक्त त्या ट्रॅकसंदर्भात आहे कारण तेवढंच फक्त सार्वजनिक बांधकाम खात्याशी संबंधित होतं. त्याचवेळी महाराष्ट्र सदनाचं व आरटीओच्या अंधेरीतील इमारतीचं काम रखडलं होतं. एफएसआय देण्याच्या बदल्यात ही दोन बांधकामं करून देण्याचं त्या कंत्राटदारानं मान्य केलं आणि अत्यंत सुंदररीत्या ते पूर्णही केलं,” भुजबळ म्हणाले.

मात्र, ज्या मूळ ट्रॅकची किंमत 40 कोटी रुपये नव्हती, त्याच्या एफएसआयच्या बदल्यात दोन सुंदर इमारती त्यानं बांधून दिल्या, या सगळ्यात सरकारचा एक रुपयाही खर्च झालेला नाही असं असताना 8000 कोटींचा घोटाळा कुठून आला हेच समजत नसल्याचे भुजबळ म्हणाले. तरी हा घोटाळा 800 कोटींचा असल्याचं कागदपत्रं सांगतात, मात्र ते ही सिद्ध होऊ शकत नाही कारण असा काही घोटाळाच नाही असं भुजबळ म्हणाले.

मी महाराष्ट्र सदन सुंदर होण्यासाठी मी प्रयत्न केले असे त्यांनी सांगितले. तसेच, मी कुठल्याही कंपनीत संचालक किंवा शेअर होल्डर नाही असे भुजबळ यांनी सांगितले. काही अधिकाऱ्यांनी एकतर त्यांना नीट प्रकरण समजत नसावं किंवा त्यांना कुणीतरी वरून सांगितलं असावं असा आरोप भुजबळ यांनी केला. अर्थात, भुजबळांनी कुठल्याही अधिकाऱ्यांचं अथवा विद्यमान सरकारमधल्या नेत्यांचं नाव घेण्याचं टाळलं आणि त्याची मला कल्पना नसल्याचं सांगितलं.