मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. छगन भुजबळ यांची सुटका होणार याचा निश्चित आनंद आहे. फक्त या निर्णयाला उशीर झाला त्याचीच खंत वाटते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली.

न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर ती व्यक्ति तुरुंगात असेल तर ते बरोबर आहे. पण कुठलाही निकाल न लागता एखाद्या व्यक्तिला काही वर्ष तुरुंगात काढावी लागत असतील तर ते अन्यायकारक आहे. घटनेच्याविरोधी आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर ती व्यक्ति त्या प्रकरणावर प्रभाव टाकेल असे एखाद्या यंत्रणेला वाटते म्हणून तुरुंगात ठेवणे पूर्णपणे चुकीचे आहे असे ते म्हणाले.

अटक केल्यानंतर आरोपीला त्यांचे म्हणणे मांडण्याची योग्य संधी मिळाली पाहिजे असे पवारांनी सांगितले. छगन भुजबळ बाहेर आल्यानंतर पक्षाला फायदा होईल का ? या प्रश्नावर ते म्हणाले कि, भुजबळांनी महापौर, आमदार, मंत्रीपदावर असताना जनतेसाठी कामे केली आहेत. त्यामुळे निश्चितच पक्षाला त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल असे अजित पवारांनी सांगितले. मी, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे आम्ही सर्व मुंबईतच आहोत. आज जर सुटका झाली तर आम्ही त्यांच्या स्वागतासाठी हजर राहू असे अजित पवार म्हणाले.