मुंबई : छटपुजेसारख्या सणांच्या माध्यमातून महाराष्ट्रात सांस्कृतिक अतिक्रमण होत असल्याचा दावा करत मराठी एकीकरण समितीने यंदा सार्वजनिक ठिकाणी छटपुजेला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. गणेशोत्सवात ज्याप्रमाणे समुद्रकिनारे आणि तलावांवर विसर्जनास बंदी घालून कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था केली जाते, त्याच धर्तीवर छटपुजेसाठीही चौपाट्या, तलाव आणि नदीकिनाऱ्यांवर धार्मिक विधिंना परवानगी देऊ नये, अशी भूमिका समितीने मांडली. यासंदर्भात समितीने महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना निवेदन दिले.
छठ पुजेनिमित्त मुंबईतील समुद्रकिनारे, तलाव आणि नदीकिनारी मोठ्या संख्येने भाविक एकत्र येतात. उत्तर भारतीयांसाठी छठपूजा हा महत्त्वाचा धार्मिक उत्सव मानला जातो. या पुजेदरम्यान भाविक पाणवठ्यांवर गर्दी करतात. मात्र, सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, सुरक्षेचा प्रश्न, वाहतूक कोंडी तसेच समुद्रकिनारे आणि जलस्रोतांच्या स्वच्छतेचा मुद्दा यावरून दरवर्षी चर्चा होते. पर्यावरणाच्या रक्षणासाठी गणेशोत्सवात मूर्तींच्या विसर्जनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मग अन्य धार्मिक उत्सवांना नियमांचे बंधन का नाही, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातो.
यंदा १३ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत छटपूजा साजरी होणार आहे. या निमित्ताने परराज्यांतील नागरिकांकडून समुद्रकिनारे, तलाव, नद्या आणि अन्य जलस्रोतांमध्ये उतरून धार्मिक विधि केले जातात. या प्रक्रियेत पूजेचे साहित्य, निर्माल्य, फळे, प्लास्टिक आणि अन्य कचरा जलस्रोतांमध्ये टाकला जात असल्याने जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत असल्याचे समितीने निवेदनात म्हटले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात महानगरपालिकेने नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जनावर निर्बंध घालून कृत्रिम तलाव आणि पोर्टेबल विसर्जन कुंडांची व्यवस्था केली होती. त्याच धर्तीवर छटपुजेसाठीही सार्वजनिक जलस्रोतांमध्ये प्रवेशास बंदी घालावी. धार्मिक विधि करण्यासाठी इच्छुकांनी खासगी जागांमध्ये स्वतःच्या खर्चाने तात्पुरते पोर्टेबल जलकुंड किंवा पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था करावी, असे मत समितीने व्यक्त केले. अन्य राज्यांतील सणांच्या आयोजनासाठी महाराष्ट्रातील करदात्यांचा पैसा खर्च होऊ नये. अशा कार्यक्रमांमुळे महापालिका आणि पोलीस प्रशासनावर अतिरिक्त ताण येतो. महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख अबाधित राखण्यासह समुद्रकिनारे, तलाव आणि नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी छटपुजेला परवानगी नाकारावी, अशी मागणी समितीने निवेदनात केली आहे.
