मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेला १७ ऑगस्ट रोजी ३६० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आग्रा येथे आयोजित करण्यात आलेल्या शौर्य सोहळ्यासाठी राज्यातून शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना झाले आहेत. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातून विविध भागांतून शिवप्रेमी सहभागी होणार आहेत.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या स्थापनेला यंदा १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेला ३६० वर्षे पूर्ण होत असल्याने या दोन्ही ऐतिहासिक घटनांचे औचित्य साधून महासंघाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आग्रा येथील शौर्य सोहळा हा त्याच उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे.

मुंबईहून आग्र्याकडे रवाना झालेल्या शिवप्रेमींच्या तुकडीचे शुक्रवारी टिळकनगर रेल्वे स्थानकावर उत्साहात निरोप देण्यात आला. या तुकडीत अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताव, धोंडू जाधव, अविनाश राणे यांच्यासह सुमारे २० पदाधिकारी आणि शिवप्रेमींचा समावेश आहे.

छत्रपती शिवाजी महाराज १६६६ मध्ये औरंगजेबाच्या दरबारात आग्रा येथे गेले होते. दरबारातील घडामोडीनंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. मात्र, आपल्या असामान्य चातुर्य आणि धाडसाच्या बळावर महाराजांनी १७ ऑगस्ट १६६६ रोजी नजरकैदेतून सुटका करून घेतली. पुढील काळातील मराठा साम्राज्याच्या इतिहासावर दूरगामी परिणाम करणाऱ्या या घटनेला भारतीय इतिहासात विशेष महत्त्व आहे.

या ऐतिहासिक प्रसंगाच्या ३६०व्या वर्षपूर्तीनिमित्त आग्रा येथे होणाऱ्या शौर्य सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना होत असून, ऐतिहासिक स्थळी महाराजांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.