प्रवाशांबरोबरच पर्यटकांसाठी खास आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ऐतिहासिक इमारतीला २० मे रोजी १३० वर्षे पूर्ण झाली. या इमारतीचे बांधकाम हे गॉथिक शैलीतील आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्येच वस्तुसंग्रहालय करण्याचा प्रस्तावही रेल्वे मंत्रालयाने आखला आहे.
आशियातील पहिल्या रेल्वेचा प्रवास १६ एप्रिल १८५३ साली बोरिबंदर ते ठाणे असा झाला. या रेल्वेसाठी ग्रेट इंडियन पेनिनसुला ही रेल्वे कंपनी स्थापन करण्यात आली आणि त्याचे प्रथम कार्यालय सुरुवातीला मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकर शेठ यांच्या घरात होते. मे १८७८ मध्ये स्थापत्य रचनाकार फ्रेडरीक विल्यम स्टीव्हन यांनी या कंपनीचे मुख्यालय बांधण्यास सुरुवात केली आणि २० मे १८८८ मध्ये इमारत बांधून पूर्ण झाली. त्याकाळी ही इमारत बांधण्यासाठी १६.१४ लाख रुपये खर्च करण्यात आले. १८८७ मध्ये लंडनची राणी व्हिक्टोरिया हिच्या ज्युबिली सेलिब्रेशननिमित्त इमारतीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस ठेवण्यात आले. त्यानंतर १९९६ मध्ये या इमारतीचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ठेवण्यात आले.
ही इमारत पूर्व पश्चिम अशी बांधण्यात आली आहे आणि इंग्रजी आद्याक्षर ‘सी’प्रमाणे तिचा आकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीच्या तळमजल्यावर छोटेखाणी संग्रहालयही आहे, तर लांब पल्ल्यांच्या गाडय़ा थांबणाऱ्या फलाट क्रमांक १८च्या मागील प्रवेशद्वाराजवळ हेरिटेज गल्लीही स्थापन केली असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.