मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडा नगर येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी ‘छेडा नगर रस्ते सुधार प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून आतापर्यंत शीव – ठाणे उड्डाणपुलाचे २१ टक्के, तर मानखुर्द – ठाणे उड्डाणपुलाचे ७१ टक्के काम पूर्ण झाले आहे. आता निर्धारित वेळेत दोन्ही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले करण्याचा एमएमआरडीएचा मनस आहे. हे उड्डाणपूल सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवासाचा वेळ २० ते २५ मिनिटांनी कमी होईल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे.

Maharashtra Political Crisis Live : सुनावणी होईपर्यंत आमदारांवर कारवाई नको, विधानसभा अध्यक्षांना कोर्टाच्या सूचना

‘छेडा नगर वाहतूक सुधार प्रकल्पां’तर्गत छेडा नगर येथे तीन उड्डाणपूल आणि एक सब-वे बांधण्यात येत आहेत. यापैकी पहिला तीन मार्गिकेचा पूल ६८० मीटर लांबीचा असून तो शीव आणि ठाण्याला जोडणारा आहे. दुसरा दोन मार्गिकेचा उड्डाणपूल १,२३५ मीटर लांबीचा असून तो मानखुर्द रोडपासून थेट ठाण्याला जोडण्यात येणार आहे. तिसरा ६३८ मीटर लांबीचा छेडा नगर उड्डाणपूल सांताक्रुझपासून चेंबूर जोडरस्त्याला जोडण्यात येणार आहे. यासाठी २४९.२९ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. यापैकी ६३८ मीटर लांबीचा छेडा नगर उड्डाणपूल मार्चमध्ये वाहतुकीस खुला झाला आहे. सांताक्रूझ ते चेंबूर जोडरस्ता प्रकल्पास हा उड्डाणपूल जोडण्यात आला असून हा पूल खुला झाल्याने छेडा नगर येथील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होत आहे. छेडा नगर उड्डाणपुलासह ५१८ मीटर लांबीच्या आणि ३७.५ मीटर रुंदीच्या सब-वेचा पहिला टप्पाही पूर्ण झाला असून तो वाहतूक सेवेत दाखल झाला आहे.

दुसऱ्या टप्प्याच्या कामाला वेग –

छेडा नगर उड्डाणपूल आणि सब-वेचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर आता एमएमआरडीएने उर्वरित दोन उड्डाणपुलाच्या तसेच वाहन सब-वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला वेग दिला आहे. आतापर्यंत शीव – ठाणे उड्डाणपुलाचे २१ टक्के आणि मानखुर्द – ठाणे उड्डाणपुलाचे ७१ टक्के काम पूर्ण झाले असून सब-वेचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ २० ते २५ मिनिटांनी कमी होईल. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.