मुंबई : शिवसेना नेते अजय भोसले यांच्यावर २००९ मध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने कुख्यात गुंड छोटा राजन याच्यासह पाचजणांची निर्दोष सुटका केली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ११ ऑक्टोबर २००९ रोजी पुण्याच्या कोरेगाव भागात मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी अजय भोसले यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश नरेंद्रनाथ प्रधान यांनी राजन याच्यासह व्यावसायिक सुरेंद्र अग्रवाल, शकीब आलम खान, राजेश यादव आणि विजय पुरुषोत्तम साळवी यांची त्यांच्यावरील सर्व आरोपांतून निर्दोष सुटका करत असल्याचे निकाल देताना स्पष्ट केले.

सरकारी पक्षाच्या आरोपांनुसार, हा हल्ला सुरेंद्र अग्रवाल आणि त्याचे भाऊ आर. के. अग्रवाल व व्ही. के. अग्रवाल यांच्यातील मालमत्तेच्या वादातून झाला होता. सुरेंद्र याने राजनच्या एका कथित साथीदाराच्या मदतीने आर. के. अग्रवाल यांच्यावर कौटुंबिक मालमत्तेतील हवा असलेला हिस्सा देण्याबाबत दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. भोसले हे आर. के. अग्रवाल यांचे मित्र होते. या हल्ल्यात अजय भोसले सुदैवाने बचावले, मात्र एक गोळी त्यांच्या ”स्कॉर्पिओ” गाडीच्या चालकाला लागली होती.

या प्रकरणाचा तपास सुरुवातीला पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्याद्वारे करण्यात आला होता. मात्र, २०१५ मध्ये राजन याला भारतात परत आणल्यानंतर, त्याच्याविरुद्धच्या ७१ प्रकरणांपैकी हे एक प्रकरण महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. सध्या तिहार तुरुंगात बंदिस्त असलेला राजन, मुंबईतील पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. याव्यतिरिक्त इतर अनेक प्रकरणांमध्येही त्याला दोषी ठरवण्यात आले आहे.