मुंबई : सुमारे ३८ वर्षांपूर्वी दोन पोलिसांना मारहाण करून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपांतून कुख्यात गुंड छोटा राजन याला विशेष न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष ठरवले.राजनवर हत्येचा प्रयत्न करणे, सरकारी कर्मचाऱ्याला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करण्याच्या आरोपाअंतर्गत खटला चालवण्यात आला. मात्र खटल्याशी संबंधित बहुतांश साक्षीदारांचा ठावठिकाणा सापडत नसल्याचा तसेच प्रकरणाची कागदपत्रेही गहाळ झाल्याचे तपास अधिकाऱ्याने न्यायालयाला सांगितले. तसेच प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल न्यायालयात सादर केला. परंतु न्यायालयाने तपास पुढे सुरू ठेवण्याचे आदेश सीबीआयला दिले होते. परंतु साक्षीदार सापडत नसल्याचे सीबीआयकडून न्यायालयाला सांगण्यात आले. त्यामुळे विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी राजनला त्याच्यावरील या सगळ्या आरोपांतून पुराव्याअभावी निर्दोष  ठरवले.

सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करीत होते. राजनच्या अटकेनंतर तपास सीबीआयकडे वर्ग झाला. हे प्रकरण १९८३ मधील आहे. घाटकोपर येथे पोलिसांनी एक टॅक्सी थांबवली. या टॅक्सीतून राजन त्याच्या साथीदारांसोबत मद्याची तस्करी करत असल्याचे उघड झाले. दोन पोलिसांनी राजनला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने चाकूने त्यांच्यावर हल्ला केला, असा त्याच्यावर आरोप होता.