मुंबई : व्यापारी सय्यद फरीद मकबूल यांच्या १९९६ साली झालेल्या हत्येच्या आरोपांतून विशेष सीबीआय न्यायालयाने कुख्यात गुंड छोटा राजन याची गुरुवारी पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. त्याचवेळी, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या एजाज लकडावाला याला मात्र विशेष न्यायालयाने त्याच्यावरील सर्व आरोपांत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान, या प्रकरणामुळे राजनवर दाखल असलेल्या खटल्यांपैकी आणखी एका खटल्यातून त्याची निर्देोष सुटका झाली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी लकडावाला याला हत्येसह शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हुसैन यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांपैकी एकजण लकडावाला असल्याचा पोलिसांचा आरोप होता. दाऊद आणि राजन यांच्यात त्याकाळी सुरू असलेल्या टोळीयुद्धादरम्यान हा हल्ला झाला होता. हेही वाचा - मुंबई : वायू गुणवत्ता सर्वेक्षणासाठी चार फिरती वाहने पोलिसांनी याप्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, ७ ऑक्टोबर १९९६ रोजी लकडावाला आणि त्याच्या साथीदाराने हुसैन यांच्या मोहम्मद अली रोड परिसरातील दुकानात घुसून गोळीबार केला होता. त्यानंतर, त्यात जखमी झालेल्या हुसैन यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. या गोळीबाराच्या वेळी, लकडावाला याच्या पायालाही गोळी लागली. त्याच्या पिस्तुलातून चुकून सुटलेली गोळी त्याच्याच पायाला लागली. त्याने आणि त्याच्या साथीदाराने त्याही स्थितीत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना पकडले. सुरुवातीला हत्येचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी लकडावाला याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले व राजन याला फरारी आरोपी म्हणून दाखवले होते. पुढे, राजनला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करण्यात आला. हेही वाचा - ज्येष्ठ नागरिकांना त्रास देणाऱ्या विकासकांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करा, उच्च न्यायालयाचे राज्य शासनाला आदेश आपल्यावर गोळीबार करणाऱ्यांनी नाना असा शब्द उच्चारला होता, असे हुसैन यांनी मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले होते. न्यायालयाने हुसैन यांचा भाऊ आणि तीन प्रत्यक्षदर्शींची साक्ष लकडावाला याला त्याच्यावरील सर्व आरोपांत दोषी ठरवताना ग्राह्य मानली. साक्षीदार आणि तक्रारदार यांचे जबाब आरोपींचा गुन्ह्याशी संबंध जोडण्यासाठी पुरेसा असल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला होता.