मुंबई : कुख्यात गुंड छोटा शकीलचा मेहुणा सलीम इकबाल कुरेशी ऊर्फ सलीम फ्रूट याच्याशी संबंधित कथित मालमत्ता हडप व काळ्या पैशाच्या (मनी लॉन्डरिंग) प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरातील ‘लॅम्बट’ इमारत तात्पुरती जप्त केली. ही इमारत सलीम फ्रूटची पत्नी शाजिया सलीम इकबाल कुरेशी हिच्या नावावर नोंदविण्यात आली होती. या कारवाईत बांधकाम व्यावसायिक असलम अब्दुल रहमान पटनी व अन्य आरोपींची बँक खाती गोठविण्यात आली असून, मालमत्तांचे एकत्रित मूल्य सुमारे चार कोटी रुपये आहे. मुंबई विभागीय कार्यालयाने मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) ही कारवाई केली.

ईडीच्या तपासानुसार, लॅम्बट इमारतीतील यास्मिन मोहम्मद अहमद आणि दिवंगत शेरजादा जंगरेज खान यांच्या मालकीचा ५० टक्के हिस्सा २०१९ मध्ये असलम पटनी याने कथितरित्या बळकावला. दाऊद इब्राहिम आणि सलीम फ्रूट यांच्या नावाचा वापर करून संबंधित मालकांना धमकावण्यात आले. कोणताही मोबदला न देता त्यांचा मालकी हक्क काढून घेण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर पटनी याने ही मालमत्ता सलीम फ्रूटची पत्नी शाजिया हिच्या नावावर हस्तांतरित केली. मालमत्तेचे व्यवहार कायदेशीर असल्याचे भासविण्यासाठी विविध टप्प्यांत हस्तांतरण करण्यात आल्याचा ईडीचा संशय आहे.

या प्रकरणात शब्बीर अहमद हसन करोलिया व युसूफ अहमद हसन करोलिया यांनी मूळ मालक असल्याचे भासवून बनावट हस्तांतरण दस्तऐवज तयार केल्याचा आरोप आहे. या कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता बेकायदा पद्धतीने मिळविण्यात आल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे दाखल झालेल्या फसवणूक, गुन्हेगारी कट, विश्वासघात व बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या तक्रारीवरून सुरू झाला.

दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास असलेल्या एका व्यावसायिकाने उमरखाडी येथील वडिलोपार्जित इमारत सलीम फ्रूटच्या मदतीने नातेवाइकांनी हडपल्याची तक्रार केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला व पुढे ईडीने मनी लॉन्डरिंगच्या अनुषंगाने तपास सुरू केला. मालमत्तेचे बेकायदा हस्तांतरण, त्यातून मिळालेला आर्थिक लाभ व संबंधित बँक खात्यांतील व्यवहार याबाबत ईडीकडून तपास सुरू आहे. ही जप्ती तात्पुरत्या स्वरूपाची असून, या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.