मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजोय मेहतांनी नरिमन पॉईंटला घेतला ५.३ कोटींचा फ्लॅट

कधी आणि कसा झाला व्यवहार….

संग्रहित छायाचित्र

मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त, राज्याचे माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी अलीकडेट नरिमन पॉईंट भागात ५.३ कोटी रुपयांना एक फ्लॅट विकत घेतला आहे. अजोय मेहता सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार आहेत. मेहता यांनी मंत्रालयाजवळच्या जग्गनाथ भोसले मार्गावरील समता को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरचा फ्लॅट विकत घेतला आहे. १,०७६ चौरस मीटर या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे.

ऑक्टोबर महिन्यात या व्यवहारावर शिक्कमोर्तब झालं होतं. अजोय मेहता यांना फ्लॅटसह इमारतीत दोन कार पार्किंगचे स्लॉटही मिळाले आहेत. अजोय मेहता यांनी बाजारभावाने हा फ्लॅट विकत घेतला आहे. या व्यवहाराची सर्व कागदपत्रं पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहेत. बाजारभावानुसार या फ्लॅटची किंमत ५.३३ कोटी रुपये आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिलेय.

हा आलिशान फ्लॅट खरेदी करताना अजोय मेहता यांनी आरटीजीएसने २.७६ कोटी रुपये दिले तर चेकच्या माध्यमातून अडीज कोटी रुपये दिले. तीन लाख ९७ हजार ५०० रुपये इतकी रक्कम करापोटी कापण्यात आली. उपलब्ध कागदपत्रांनुसार, हा फ्लॅट विकणाऱ्या पुण्यातील अनामित्रा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने स्टॅम्प ड्युटीपोटी १०.६८ लाख रुपये भरले. अनामित्रा प्रॉपर्टीजने २००९ साली आशिष मनोहर यांच्याकडून चार कोटी रुपयांना हा फ्लॅट विकत घेतला होता.

२८ ऑगस्ट २०२० रोजी मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्याने १६.८० लाख रुपये ट्रान्सफर फी भरुन हा फ्लॅट ट्रान्सफर करायला परवानगी दिली. हा फ्लॅट विकणाऱ्या अनामित्रा प्रॉपर्टीजने ही रक्कम भरली. अजोय मेहता १९८४ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मे २०१९ मध्ये ते राज्याचे मुख्य सचिव बनले. त्याआधी चारवर्ष ते मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. ३० सप्टेंबर २०१९ मध्ये ते निवृत्त होणार होते. पण राज्यात विधानसभा निवडणूक असल्याने त्यांना सहा महिने मुदतवाढ देण्यात आली. ३१ मार्चला मुदतवाढीचा कालावधी संपल्यानंतर करोना संकटामुळे पुन्हा तीन महिने वाढवून देण्यात आले. ३० जूनला निवृत्त झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chief advisor to chief minister uddhav thackeray ajoy mehta buys nariman point flat for rs 5 3 cr dmp

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या