मुंबई : अठरा वर्षांच्या वकिलीनंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाल्यानंतर लगेचच आपल्याला नागपूर खंडपीठात पाठवण्यात आले. त्याआधी कोणीच न्यायमूर्ती त्यांच्या काही कारणांमुळे नागपूर खंडपीठामध्ये काम करण्यास तयार नव्हते. तथापि, मोठ्या अंतरानंतर आपल्याला तेथे जाण्यास सांगण्यात आले आणि आपण तेथे रूजू झालो, असा खुलासा सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शनिवारी उच्च न्यायालयातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या वेळी केला.
नागपूर खंडपीठात कार्यरत झाल्यानंतर पहिल्याच दिवशी आपण एका अपिलावर निर्णय दिला. तेथे काही काळ काम केल्यानंतर आपल्याला आधी औरंगाबाद, मग मुंबई, पुन्हा नागपूर, परत औरंगाबाद आणि मध्येच गोवा खंडपीठात पाठवण्यात आले.
मुंबईत आल्यानंतर वडील आजारी असल्याच्या वैयक्तिक कारणास्तव आपण तत्कालिन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्याकडे आपल्याला नागपूर खंडपीठात काम करू देण्याची विनंती केली. ती मान्य केली गेली. काही काळ नागपूरमध्ये काम केल्यानंतर मुंबई खंडपीठात कार्यरत होण्यास सांगितले गेले. नंतर मग सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाली आणि आता सरन्यायाधीशपदी आपण कार्यरत आहोत, असे सांगून गवई यांनी न्यायमूर्तीपदाचा प्रवास यावेळी विशद केला.
मुंबईत पहिल्यांदा खंडपीठात काम करण्याची संधी मिळाली तेव्हा आपल्याला सोपवलेली जबाबदारी खूपच नवीन होती. प्राप्तिकराशी संबंधित प्रकरणे आपल्यापुढे सूचीबद्ध होती. यापूर्वी ही प्रकरणे आपण कधीच हाताळली नव्हती आणि समोर या विषयांतील दिग्गज वकील युक्तिवादासाठी उभे राहायचे.
त्यामुळे, आपल्यासाठी ही प्रकरणे नवीन असल्याची प्रांजळ कबुली देऊन काही दिवस आपल्याला न्यायमूर्ती म्हणून नाही, तर विद्यार्थी म्हणून वागणूक देण्याची विनंती आपण या वकिलांना केल्याचे गवई यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर, मात्र आपण ही प्रकरणेही सहजपणे हाताळू लागलो. पुढेही हाच कित्ता कामकाजाबाबतच्या नव्याने येणाऱ्या जबाबदाऱ्यांबाबत आपण गिरवल्याचे सरन्यायाधीशांनी प्रामुख्याने नमूद केले.