मुंबई : समाजाच्या गरजांनुरूप कायद्याचे आणि संविधानाचा अर्थ लावायला हवा. विशेषकरून सध्याच्या पिढीसमोरील समस्या विचारात घेऊन हा अर्थ लावणे आणि त्याची व्याख्या करणे व्यावहारिक ठरेल, असे परखड मत देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शनिवारी व्यक्त केले. त्याचवेळी, न्यायमूर्तींची नियुक्ती गुणवत्तेच्या आधारेच केली जाईल याचा पुनरूच्चार करून कोणत्याही परिस्थतीत न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याशी तडजोड केली जाणार नसल्याचेही सरन्यायाधीशांनी यावेळी प्रामुख्याने स्पष्ट केले.
अन्य उच्च न्यायालयात अलिकडेच घडलेल्या घटनेबाबत नाराजी व्यक्त करताना न्यायमूर्तींनी त्यांच्या पदाशी प्रामाणिक राहण्याचे आवाहन सरन्यायाधीशांनी यावेळी केले. मुंबई उच्च न्यायालयाता समृद्ध परंपरा असून अशी घटना मुंबईत घडू नये, असेही न्यायमूर्ती गवई यांनी स्पष्ट केले. तसेच, न्यायमूर्तींनी आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचेही स्पष्ट केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण सोमवारपासून सुरू होणार आहे. याशिवाय न्यायालयात वायफाय सेवाही सुरू केली जाणार आहे. या सुविधांचा सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले. त्यावेळी, न्यायमूर्ती गवई यांनी उपरोक्त बाबी स्पष्ट केल्या.
काही सहकाऱ्यांच्या असभ्य वर्तनाबद्दल आपल्याकडे तक्रारी आल्याचेही सरन्यायाधीशांनी बोलून दाखवले व त्याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच, न्यायमूर्तींनी घटनात्मक संस्थेची प्रतिष्ठा जपावी. त्यांनी त्यांच्या विवेकबुद्धीनुसार, न्यायमूर्ती म्हणून नियुक्त होताना घेतलेल्या शपथेनुसार आणि कायद्यानुसार काम करावे. कृपया असे काहीही करू नका, ज्यामुळे या उच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल.
मुंबई उच्च न्यायालयाची प्रतिष्ठा अनेक वकिलांच्या आणि न्यायमूर्तींच्या समर्पणाने, कष्टाने निर्माण झाली आहे. ती कायम ठेवा, असे आवाहनही न्यायमूर्ती गवई यांनी केली. न्यायमूर्तीपद हे कामाच्या वेळेपलीकडे जाणारी एक जबाबदारी आहे. तसेच, न्यायमूर्ती होणे हे १० ते ५ या वेळेतील काम नसून, समाजाची, देशाची सेवा करण्याची संधी असल्यावरही त्यांनी भर दिला.