मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करणारा मजकूर समाजमाध्यमावर प्रसिद्ध केल्याप्रकरणी ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांच्याविरोधात ११ गुन्हे दाखल केल्याच्या मुद्दय़ावरून उच्च न्यायालयाने शुक्रवारी पोलिसांवर ताशेरे ओढले.
परांजपे यांनी त्यांच्याविरोधात पोलिसांनी दाखल केलेले विविध गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राजकीय हेतूने हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा करून सर्व गुन्हे एकत्रित करण्याची आणि ते रद्द करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याबाबत समाजासमाध्यमांतून बदनामी केल्याप्रकरणी परांजपे यांच्याविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने पोलिसांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच परांजपे यांनी त्यांच्यावर दाखल प्रत्येक प्रकरणात जामिनासाठी अर्ज का करावा? अशी विचारणा करून मुळात इतक्या वेळा गुन्हा दाखल करायलाच नको होता. अशाप्रकारे गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांवर दंड आकारला पाहिजे आणि त्यांच्या पगारातून तो वसूल केला पाहिजे. त्यानंतर त्यांना धडा मिळेल, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.