मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच विविध महामंडळाअंतर्गत सुरू असलेल्या शासकीय योजनांमुळे महिलांचे आर्थिक सबलीकरण होत असून या महिलांना आता आर्थिकरित्या अधिक सक्षम करण्यासाठी नऊ टक्के अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केले.
शासनामार्फत सुरू असलेल्या महिलांसाठीच्या व्याज परतावा योजनेची मुंबै बँकेच्या कर्ज योजनेसह सांगड घालण्यासाठी आणि महिलांना आर्थिक सक्षम करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या ‘ वर्षा ’निवासस्थानी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार तथा मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, आमदार चित्रा वाघ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओम प्रकाश गुप्ता, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव आदी उपस्थित होते.
महिलांना स्वयंपूर्ण उद्योजक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महामंडळ आणि ‘मुंबै बँक संयुक्तपणे हा उपक्रम राबविणार आहे. मुंबईतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना आर्थिक साक्षर करण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून वैयक्तिक व सामुहिक कर्ज देऊन त्यांना उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी मदत केली जाईल. तसेच पर्यटन संचालनालय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत विविध वैयक्तिक व गट कर्ज योजना राबविण्यात येतात. यामुळे महिलांना स्वत:चा व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी नऊ टक्के इतक्या अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईत १६ लाख इतके लाभार्थी असून मुंबै बँकेच्या विशेष कर्ज धोरण अंतर्गत वैयक्तिक व गटाला एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक कर्ज नऊ टक्के दराने देण्यात येईल, असे दरेकर यांनी नमूद केले.