जलसंपदामंत्री गिरीश महाजन नेहमीच स्वतःजवळ पिस्तूल बाळगतात, असे सांगून त्यांनी पिस्तूल बाळगलं, यात बेकायदा काहीच नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधान परिषदेत दिले. गिरीश महाजन यांनी रविवारी चक्क पिस्तूल कमरेला खोचून मूकबधिर विद्यार्थ्यांसमोर भाषण केले. त्यांच्या या कृतीविरोधात विधान परिषदेत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्यावर फडणवीस यांनी त्याला उत्तर दिले.
मंत्र्याचे विद्यार्थ्यांसमोर पिस्तूल खोचून भाषण
राज्यातील मंत्री सुरक्षित नाहीत का, असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. त्यावर फडणवीस म्हणाले, महाजन यांनी पिस्तूल बाळगलं, यात बेकायदा काहीच नाही. ते नेहमीच स्वतःजवळ पिस्तूल बाळगतात.
आमदाराला किंवा मंत्र्याला सरकारतर्फे सुरक्षा देण्यात येते. गिरीश महाजन यांनादेखील संरक्षण आहे. मात्र, त्यांनी मूकबधिर मुलांच्या कार्यक्रमात पिस्तूल लावून उपस्थित राहिल्याने तो चर्चेचा विषय झाला होता. विशेष म्हणजे मूकबधिर विद्यार्थ्यांसमोर आपण बोलत आहोत, याचे भानही महाजन यांनी ठेवले नाही. महाजन यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल आहे.