मुंबई : ‘निवडणुका जवळ आल्यावर उद्धव ठाकरे यांना मराठी माणूस आठवतो. आता मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, अशी भाषा सुरू होईल. मुंबई यांच्यासाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती व ती कापण्याचे काम त्यांनी केले. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही मुंबईचा चेहरामोहरा बदलून दाखविला, पण तुम्ही मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार करण्याचे काम केले, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.
भाजपचे प्रदेश महाअधिवेशन वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात मंगळवारी झाले. या वेळी रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय सरचिटणीस अरुणसिंह, विनोद तावडे, निवडणूक निरीक्षक व केंद्रीय मंत्री किरण रिज्जीजू, मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अनेक मंत्री, केंद्र व राज्यातील नेते, पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. चव्हाण यांनी बावनकुळे यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. या वेळी फडणवीस यांनी ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी मराठीच्या नावावर केवळ राजकारण केले. बीडीडी चाळीत राहणाऱ्यांना आणि धारावीतील गरिबांना घरे देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला, असे फडणवीस यांनी नमूद केले. तर राज्यघटनेतील ‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष असा नसून, सर्वधर्मसमभाव असा आहे. हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या वेळी केले.
‘आम्हाला प्रत्येक भाषेचा अभिमान’
महाराष्ट्रात मराठीची सक्ती आहे व तिसरी भाषा ऐच्छिक आहे. शाळांमध्ये मराठी शिकावीच लागेल, पण आम्हाला हिंदी व देशातील प्रत्येक भाषेचा अभिमान आहे. इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि भारतीय भाषेला विरोध करायचा, हे आम्ही सहन करणार नाही. हिंदी भाषा सक्ती ठाकरे यांनी केली व आम्ही तिसरी भाषा ऐच्छिक ठेवली. तरीही सत्तेबाहेर आल्यावर सवयीप्रमाणे ठाकरे यांनी घुमजाव करून दुटप्पी भूमिका घेतली आहे. पणकोणाच्याही दबावाला न झुकता राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस म्हणाले