मुंबई : लोकसभा निवडणुकीत घटना बदलणार, आरक्षण रद्द करणार या विरोधकांच्या खोट्या कथानकावर विश्वास ठेवून जनतेने मतदान केले. पण आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता ती चूक करणार नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करीत मराठा, आोबीसी, दलित, आदिवासी महायुतीच्या पाठीशा उभे राहतील आणि महायुतीचा भगवा झेंजा पुन्हा विधान भवनावर फडकेल, असा दावा केला. शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शिंदे गटाने आयोजित केलेल्या मेळाव्यात शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यातच निम्मा वेळ खर्च केला. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मुस्लिम मतांच्या जोरावर ९ जागा जिंकल्याचा आरोपही शिंदे यांनी केला.

दोन लाख मते जादा

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा आपल्या शिवसेनेला राज्यात दोन लाख जादा मते पडली आहेत. समोरासमोर तेरा मतदारसंघात झालेल्या लढतीत आम्ही ७ जागा जिंकून ठाकरे सेनेवर मात दिली आहे. कोकण, ठाणे, संभाजीनगर असे पारंपारिक बालेकिल्लेही आम्हीच सर केल्याने खरी शिवसेना ही कोणाची यावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे नाव बदलावे, असा सल्लाही शिंदे यांनी दिला.

हेही वाचा >>>बीबीए, बीसीए अभ्यासक्रमाची पुनर्परीक्षा होणार ? सीईटी कक्षाकडून सरकारकडे विचारणा

ठाणे, कोकण, संभाजीनगर हे बालेकिल्ले आपण अबाधित ठेवले. ठाणे, कल्याण लोकसभा तर दोन दोन लाखांच्या फरकाने जिंकली. कोकणात एकही जागा ठाकरे गटाला मिळाली नाही. या निकालांनी दोन वर्षापूर्वी आपण केलेला उठाव हा योग्य होता यावर जनतेनेच शिक्कामोर्तब केले आहे, त्यामुळे खरी शिवसेना आपलीच आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली असल्याचा टोला शिंदेंनी लगावला.

महाविकास आघाडीचे उमेदवार कसे जिंकले ते महाराष्ट्राला माहीत आहे. पण ही तात्पुरती आलेली सूज आहे. एकनाथ शिंदे संपणार , शिवसेना संपणार म्हणणाऱ्यांचे दात घशात घातले. एकनाथ शिंदे शिवसैनिक आणि जनतेच्या साथीने जिंकला. हा शिंदे संपणार नाही. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि दिघेंचा चेला. जनतेचा माझ्यावर प्रेम आहे. देशात जे धाडस कोणी केले नाही ते मी करून दाखविले. भीती माझ्या रक्तात नाही. राजकीय पंडित एक दोन जागा येतील सांगत होते. ठाणे जाईल सांगत होते. पण जनतेेने आम्हालाच कौल दिला, असेही शिंदे म्हणाले.