chief minister eknath shinde invitation to industrialist for investment in maharashtra zws 70 | Loksatta

‘सिनार्मस’ची राज्यात २० हजार कोटींची गुंतवणूक; उद्योगांना महाराष्ट्रात येण्याचे मुख्यमंत्र्यांचे आमंत्रण

‘सिनार्मस’ हा आशियातील सर्वात मोठा कागद निर्मिती क्षेत्रातील उद्योग आहे.

‘सिनार्मस’ची राज्यात २० हजार कोटींची गुंतवणूक; उद्योगांना महाराष्ट्रात येण्याचे मुख्यमंत्र्यांचे आमंत्रण
मुख्यमंत्री  शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील धेरंड येथे २८७ हेक्टर जमिनीचे वाटप पत्र प्रदान करण्यात आले.

मुंबई: महाराष्ट्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण असून अधिकाधिक उद्योगांनी राज्यात गुंतवणुकीसाठी पुढे यावे, त्यांना सर्व आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली. इंडोनेशियाची ‘मे. सिनार्मस पल्प अ‍ॅण्ड पेपर कंपनी’ राज्यात २० हजार कोटींची गुंतवणूक करणार असून, मुख्यमंत्री  शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील धेरंड येथे २८७ हेक्टर जमिनीचे वाटप पत्र प्रदान करण्यात आले.

मंत्रालयात आयोजित या कार्यक्रमास उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, सिनार्मस कंपनीचे संचालक सुरेश किल्लम, कंपनीचे भारतातील प्रमुख सिद्धार्थ फोगट आदी उपस्थित होते.

राज्यात उद्योगांचा विस्तार करताना, गुंतवणूक करताना उद्योगांनी कोणतीही काळजी करू नये, सर्व आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील. उद्योग उभारल्यानंतर त्या भागात रस्ते, पाणी यासारख्या पायाभूत सुविधा देखील निर्माण करण्यात येतील, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. राज्यात गेल्या अडीच वर्षांतील सर्व प्रलंबित प्रस्तावांवर कार्यवाही करण्यात येत असून गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांच्या पाठीशी सरकार आहे, त्यांना सर्व आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील, असे फडणवीस यांनी सांगितले.

‘सिनार्मस’ हा आशियातील सर्वात मोठा कागद निर्मिती क्षेत्रातील उद्योग आहे. हा उद्योग भारतात प्रथमच तोही रायगड येथे उभारणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा हजार कोटी तर दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त दहा हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून याद्वारे प्रत्यक्ष सात हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी कंपनीला आवश्यक असलेल्या तीनशे हेक्टरऐवजी २८७ हेक्टर एमआयडीसीची जमीन या कंपनीला देण्यात आली असून आज या जमिनीचे वाटप पत्र कंपनीला प्रदान करण्यात आले.  मंत्रिमंडळ उपसमितीच्या २० ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत ‘सिनार्मस’ कंपनीला टप्पेनिहाय गुंतवणूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या कंपनीला औद्योगिक प्रोत्साहन अनुदान देण्यास देखील उपसमितीने मान्यता दिली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 02:55 IST
Next Story
Mumbai Fire : गोरेगाव आयटी पार्कमागील जंगलात भीषण आग